उच्चशिक्षण संस्थांच्या विकासासाठी सर्व संस्थाचालकांनी संघटितपणे प्रयत्न करावेत.
-पद्मजादेवी मोहिते-पाटील
बार्शी:उच्चशिक्षण संस्थांसमोर बदलत्या काळात निर्माण झालेल्या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी, उच्चशिक्षण संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व संस्थाचालकांनी संघटितपणे प्रयत्न केले तरच, हे प्रश्न अधिक लवकर सुटू शकतात असे मत उच्चशिक्षण संस्थाचालकांची सेवाभावी संस्था, सोलापूरच्या अध्यक्ष पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी व्यक्त केले.

येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलात आयोजित करण्यात आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील उच्चशिक्षण संस्थाचालकांची सेवाभावी संस्था व प्राचार्य यांच्या सहविचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी सेवाभावी संस्थेचे कार्याध्यक्ष बाबुराव गायकवाड, सहसचिव दरशथ गोप, खजिनदार मनोहर सपाटे, बळीराम साठे, डॉ. बी. वाय. यादव आदी उपस्थित होते.
अलीकडच्या काळात उच्चशिक्षण संस्थाचालकांसमोर शिक्षक पदभरती, वेतनेतर अनुदान, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीतील त्रुटी, मुक्त विद्यापीठामुळे पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयातील विद्यार्थी संख्येचे निर्माण झालेले प्रश्न आदी विषयांच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा झाली.

शासन आणि विद्यापीठ स्तरावरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व संस्थाचालकांनी यापुढे एकत्रित येऊन प्रयत्न करूयात असे आवाहन त्यांनी केले.
पद्मजादेवी यांनी उच्चशिक्षण संस्थात पदभरती होत नसल्याने गुणवत्तेचे प्रश्न निर्माण झाले आहेत. संस्था पातळीवर अनेक घटक कार्यरत असतात. त्या प्रत्येक घटकाच्या परिपूर्णतेवर एकूण संस्थेचे यश अवलंबून असते. संस्था परिपूर्ण करण्यासाठी संस्थाचालकांनी संघटनेच्या माध्यमातून शासन आणि विद्यापीठ स्तरावरील आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे सांगितले. याबरोबरच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे आणि त्यांच्या संस्थेने शैक्षणिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात केलेल्या उत्तुंग कार्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात शिवाजी शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी पी. टी. पाटील यांनी सहविचार सभेच्या आयोजनाबाबतची भूमिका विषद करताना ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या विचाराने सोलापूर जिल्ह्यातील सर्व संस्थाचालकांनी उच्चशिक्षण संस्थेच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना केली आहे असे सांगितले. भविष्यात संस्थांसमोर येणाऱ्या अडचणींच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात असे आवाहन त्यांनी केले.

दशरथ गोप यांनी सभेपुढील विषयपत्रिकेचे वाचन केले. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षक भरती प्रक्रिया, विविध अनुदाने, विद्यार्थी शिष्यवृत्ती, कौशल्याधारित शिक्षणातील अडचणी आदी विषय सभेपुढे ठेवले.
महाराष्ट्र राज्य प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. आबासाहेब देशमुख यांनी सद्यपरिस्थितीत उच्चशिक्षणात निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांची तपशीलवार मांडणी केली. संस्थाचालकांनी सर्वच प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी एकत्रितपणे शासनदरबारी प्रयत्न करायला हवेत असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सेवाभावी संस्थेने राज्य पातळीवरील संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे देशमुख म्हणाले.
डॉ. बी वाय. यादव यांनी कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या संस्थेची शैक्षणिक आणि आरोग्यविषयक वाटचाल मांडली. संस्थेने अत्याधुनिक स्तरावरील निर्माण केलेल्या ट्रॉमा युनिटची माहिती दिली.
या सहविचार सभेतील चर्चेत पद्मजादेवी मोहिते-पाटील, बाबुराव गायकवाड, दशरथ गोप, मनोहर सपाटे, माजी आमदार विनायकराव पाटील, विलास घुमरे, नंदन जगदाळे, पी.टी. पाटील, प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, प्राचार्य डॉ. राजेंद्र शेंडगे, प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोळेकर, प्राचार्य डॉ. गेजगे, डॉ. मुजमुले, आदिंनी विषयपत्रिकेवरील विषयाच्या अनुषंगाने सहभाग घेतला.
संस्थाचालकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासनदरबारी वेळोवेळी पाठपुरावा करणेबाबत निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी विविध ३५ संस्थांचे संस्थाचालक, त्यांचे प्रतिनिधी व प्राचार्य उपस्थित होते. शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नंदन जगदाळे, खजिनदार जयकुमार शितोळे, सहसचिव अरुण देबडवार, संस्थेचे सदस्य उपस्थित होते. श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. भारती रेवडकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन डॉ. विष्णू शिखरे आणि प्रा. किरण गाढवे यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक मान्यवर उपस्थित होते.
फोटो सह घ्यावी.