बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार (पोस्को) व ॲट्रॉसिटीचे आरोपातुन निर्दोष मुक्तता
बार्शी (प्रतिनिधी)- येथील मा. विशेष सत्र न्यायाधीश श्री. ए. बी. भस्मे यांनी बाल लैंगीक अत्याचार, बलात्कार व ॲट्रॉसिटीचे आरोपातुन सागर दिगंबर जाधव या आरोपीची निर्दोष मुक्तता करणेचा आदेश दि. २४/०८/२०२१ रोजी पारीत केला आहे.

सदर प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, सागर दिगंबर जाधव, रा. चिखलठाण, ता. करमाळा, जि. सोलापूर या आरोपीने ११ वर्षाचे अल्पवयीन मुलीस, तिचे वडीलांना शोधण्याच्या बहाण्याने स्वतःचे दुचाकीवर घेऊन जाऊन दमदाटी करुन व जीवे मारण्याची धमकी देऊन, लैंगीक अत्याचार, बलात्कार करुन मारहाण केल्याचे व त्यानंतर तिचे वडीलांनी त्याबाबत जाब विचारल्यानंतर पिडीताचे वडीलांना सागर दिगंबर जाधव व दिगंबर सुदाम जाधव यांनी मारहाण केल्याने बाल लैंगीक अत्याचार अधिनियम कलम ४, ६, ८ भा. दं. वि. कलम ३६३, ३७६ (२) (i), ३५४-ब, ३२३, ५०४, ५०६, ३४ व अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३ अन्वये त्यांचे विरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
विभागीय पोलिस उपअधिक्षक करमाळा यांनी आरोपीविरुध्द दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले होते. आरोप सिध्द करणेकरीता सरकारी पक्षाने पिडीत, तिचे आई वडील, जप्ती पंच, वैद्यकिय अधिकारी, तपास अधिकारी व इतर साक्षीदार असे एकूण ९ साक्षीदार तपासले होते. सर्व साक्षीदार आपले जबाबावर ठाम होते. परंतु, आरोपी व फिर्यादी यांचा जागेचे खरेदी व्यवहारावरुन वाद झालेने आरोपी विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला आहे. तसेच सरकारी पक्षांचे साक्षीदारांनी उलट तपासामध्ये दिलेली उत्तरे तसेच पिडीत व आरोपीचे वैद्यकिय तपासणीचे अहवाल, सी.ए. रिपोर्ट वैद्यकिय अधिकाऱ्यांचे उलट तपासातील उत्तरे यावरुन घटनास्थळाबद्दल, घटनेबद्दल संशय निर्माण होत असलेचा आरोपीचे विधीज्ञांचा युक्तीवाद व दाखल केलेले उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्याय-निवाडे मा. न्यायाधिश महोदय यांनी ग्राहय धरुन व समोर आलेल्या साक्षी-पुराव्यांचे मुल्यमापन करुन विशेष न्यायाधिश श्री. ए. बी. भस्मे साहेब यांनी अपहरण, बाल लैंगीक अत्याचार, बलात्कार, विनयभंग व ॲट्रॉसिटीचे आरोपातुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपी सागर जाधव यांचे वतीने ॲड. पी. पी. एडके व आरोपी दिगंबर जाधव यांचे वतीने ॲड. आय. के. शेख यांनी काम पाहिले.