जिल्हा नियोजन समिती बैठकीत विकास कामांसह विविध प्रश्नांवर आ.राऊत आक्रमक
सोलापूर: जिल्हा नियोजन समितीची बैठक, नियोजन भवन सोलापूर येथे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस आमदार राजेंद्र राऊत यांनी उपस्थित राहून बार्शी मतदार संघातील विकास कामांसाठी आवश्यक असलेला निधी व समस्यांबाबतची माहिती देऊन त्या दूर करण्याची मागणी पालकमंत्रीकडे केली.

यावेळी आ. राऊत यांनी मतदार संघातील तसेच बार्शी शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या, अनेक विकास कामांकरिता शासनाच्या विविध योजनांमधून निधीची मागणी करून, त्या निधीची तरतूद करण्याची मागणी केली
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांकरिता आवश्यक निधीची तात्काळ उपलब्धता करून द्यावी. तसेच रस्त्याची जी कामे मंजूर आहेत व ज्या कामांचे कार्यारंभ आदेश(वर्क ऑर्डर ) देऊनही संबंधित ठेकेदार कामे सुरू करीत नाहीत अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याचीही मागणी केली.

शालेय विद्यार्थ्यांकरता अत्यंत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहाराच्या पुरवठ्या बाबत माहिती देऊन, विद्यार्थ्यांच्या जिवाशी सुरू असलेल्या खेळाबाबत माहिती दिली. तसेच संबंधित ठेकेदाराकडून पुरविण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या धान्याच्या मापातील कमी प्रमाण याबाबतही माहिती देऊन संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी आमदार राजाभाऊ राऊत यांनी पालकमंत्रीकडे केली.*
*तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यां करीता तालुक्यात नवीन विद्युत रोहीत्र संचची ( ट्रान्सफॉर्मर ) मागणी केली. त्याचप्रमाणे कृषी पंपांना सुरळीत वीज पुरवठा करून, नादुरुस्त रोहीत्र संचची तात्काळ उपलब्धता करण्यासाठी वीज वितरण कंपनीला आदेश करण्याची मागणी आमदार राऊत यांनी केली.
*त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व आमदारांना शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून जास्तीचा निधी मिळावा व काही विकास कामांना महसूल खात्याच्या मार्फत येणाऱ्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक लावण्याची मागणी केली.सदर बैठकीस जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.