मुंबई : “मी सामना वाचत नाही” असे वक्तव्य विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर “सामना वाचाल तर वाचाल” अशी खोचक प्रतिक्रिया सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांनी दिली होती. सत्तेत असून भाजपावरती टीका होत असल्याने सामना भाजपाच्या कायम रडारवर राहिलेला आहे. भाजपा आता विरोधात असताना तर टीकेची एकही संधी सोडत नाही.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच सामना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती याला उत्तर देताना राऊत म्हणाले की, “मला आनंद आहे विरोधक सामना वाचत आहेत. चंद्रकांत पाटील तर सामानाचे निष्ठावंत वाचक आहेत. सामना वाचल्याने मनाला आणि बुद्धीला चालना मिळते. महाराष्ट्रातील जनता आनंदी आहे की विरोधक सामना वाचत आहेत. सामना वाचल्याने भरकटलेले विरोधक मुख्य प्रवाहात येत आहेत”. असा खोचक टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, संजय राऊत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. सामनामधून आणि विविध वाहिन्यांवरून ही मुलाखत प्रदर्शित होणार आहे. एक शरद बाकीचे गारद अशी टॅगलाईन राऊतांनी दिल्यानंतर, देवेंद्र फडणवीसांनी “एक नारद बाकीचे गारद” अशी टीका केली होती.

याचा देखील राऊतांनी खरपूस समाचार घेतला आहे. जेंव्हा देवेंद्र फडणवीस राजकारणात देखील नव्हते तेंव्हा बाळासाहेब ठाकरेंनी शरद जोशी आणि शरद पवार यांच्या विषयी ‘दोन शरद सगळे गारद’ असे सामनाच्या अग्रलेखात म्हटले होते. पण देवेंद्र फडणवीस तेंव्हा राजकारणात नसल्याने त्यांना हे काही माहीत नाहीतेवढे त्यांचे वाचन नाही असा टोला राउतांनी लगावला.
ही मुलाखत ही एक प्रकारचा राजकीय काढा आहे, जो कोरोना काळात जर विरोधकांनी पचवला तर त्यांना तो फायदेशीर ठरेल व ते राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येतील अशी टीका संजय राऊत यांनी केली.
साभार खमक्या इंडिया