पत्नीचा खून करून पती फरार! दोन चिमुकली मुले झाली पोरकी; बार्शी तालुक्यातील घटना
वैराग/प्रतिनिधी: मुंगशी (आर )ते उपळे दुमाला दरम्यान जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात कारणाने पत्नीवर पतीने कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून तिला ठार मारले असल्याची घटना मंगळवार दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. याबाबत पतीच्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .


याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , संशयित आरोपी पती किरण तुकाराम घरबुडवे रा. भातंबरे ता. बार्शी हा आपल्या पत्नी मयत सोनाली किरण घरबुडवे , मुलगी दिक्षा वय ६ व मुलगा सिद्धार्थ वय ३ यांचे सह दि. २९ रोजी धामणगाव येथे आले होते. त्यानंतर दोन-तीन दिवस ते धामणगाव येथे थांबले.
मंगळवार दि. २३ रोजी सकाळी नऊच्या सुमारास धामणगाव येथून ते भातंबरे कडे जाण्यासाठी निघाले .दरम्यान मौजे मुंगशी (आर )ते उपळे दुमाला दरम्यानच्या रस्त्यात पती किरण घरबुडवे याने आपली पत्नी सोनाली हिच्या बरोबर भांडण केले व तिच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले .असल्याची फिर्याद मयत सोनालीचा भाऊ अतुल दिलीप हेडंबे रा. धामणगाव यांनी वैराग पोलिसात दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत.