भयाण वास्तव: स्मशानात जळणार ते एकटं प्रेत….!
माणसाच्या आयुष्याच्या खऱ्या प्रवासाची सुरवात हॉस्पिटलच्या खाटेवर होऊन त्याचा शेवट स्मशानातल्या चितेवरच संपून जातो. मात्र या दोन वस्तूंच्या मध्ये त्याच्या सोबत अनेक घडामोडी घडलेल्या पाहावयास मिळतात. यात येणाऱ्या संकटांमुळे तो खरा जगायला शिकत असतो, तशी खरी मानस सुद्धा ओळखायला तो शिकत असतो.

आज कोरोनामुळे आलेल्या संकटात आजच्या घडीला माणुसकी फार मरून गेली असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही आणि तशी परिस्थिती आज कोरोनाच्या संकटात जगभर निर्माण झालेली आहे. कारण माणूस मेल्यावर त्यांच्या अवती-भोवती जमणारी गर्दी कुठेतरी नाहीशी झाली आहे. आज आपलाच माणूस परका नाही तर जीवघेणा वाटू लागला आहे.

कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येने एकीकडे सरकार चिंतेत आहे तर दुसरीकडे लोकही कोरोनाच्या दहशतीखाली जगत आहे. अनेकजणांनी मृतदेह स्वीकारण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार रखडले आहेत. काही ठिकाणी पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कोरोना संक्रमित रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

कोरोनाच्या संकटापूर्वी माणूस मेल्यावर त्याला शेवटचं बघण्यासाठी नातेवाईकांचा असणारा अट्टाहास आज कुठेतरी हरवलेला दिसून येत आहे. स्मशानात आपल्या माणसाला पोहचवण्यासाठी नातेवाईकांची असलेली गर्दी नाहीशी झालेली आहे. स्मशानात सुद्धा शुकशुकाट निर्माण झाला आहे. म्हणूनच आज स्मशानात ते प्रेत एकटं जळताना मी सोशल मीडियावर पहिले आहे.