आशादायक: कोरोनावरील दोन स्वदेशी लसींची मानवी चाचणी सुरु :ICMR संचालक डॉ बलराम भार्गव
नवी दिल्ली : जगभरात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला असून देशात कोरोनाचे रुग्ण ९ लाखावर गेले आहे. यामुळे सध्याची परिस्थिती फार गंभीर झाली आहे, अशा स्थितीत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतात कोरोनावर दोन लसी विकसित करण्यात आल्या असून मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली आहे. विशेष म्हणजे उंदीर आणि संशयित अशा दोन्ही स्वदेशी लसींची टॉक्सिसिटी स्टडीज यशस्वी झाली आहे, असे देखील ते पुढे म्हणाले आहेत.

कोव्हॅक्सिन ही लस हैदराबादची कंपनी भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने बनविली आहे. यासाठी पुण्यातील एनआयव्हीने कोरोनाचा स्ट्रेन उपलब्ध करून दिला होता. पटना एम्स (AIIMS-Patna) मध्ये या औषधाच्या चाचणीसाठी हॉस्पिटलने निवडलेल्या 10 जणांवर कोव्हॅक्सिनची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे, असे ऑल इंडिया रेडिओने म्हटले आहे.

यानुसार कोरोनाच्या या लसीचा पहिला डोस या रुग्णांना देण्यात आला असून यावर निरिक्षणे नोंदविण्यात येत आहेत. यानंतर 14 दिवसांच्या फरकाने दुसरा डोस दिला जाणार आहे.
कोरोनावरील मानवी चाचणी घेण्यासाठी या महिन्यात आम्हाला परवानगी दिली गेली आहे. त्याप्रमाणे दोन्ही मानवी लसींच्या चाचणीसाठी तयारी करण्यात आली असून या दोन्ही लसींसाठी एक – एक हजार नागरिकांचा क्लिनिकल स्टडीही करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे जगभरात वापरण्यात येणाऱ्या लसींपैकी ६० टक्के लस या भारत बनवत आहे. हे संपूर्ण जगाला माहिती असून प्रत्येक देश भारताच्या संपर्कात देखील आहे.