बार्शीत गॅरेजचालकाचा प्रामाणिकपणा, रस्त्यावर दागिने व रोख रक्कमेसह सापडलेली पर्स केली पोलीसांकडे जमा

0
175

बार्शी :

आजच्या जमान्यातही समाजात प्रामाणिकपणा व माणुसकी टिकून आहे याची प्रचिती देणारे मंगळवारी बार्शीतील एका गॅरेज चालकाच्या कृत्यातून पहायला मिळाले. सोन्याचांदीचे दागिने व काही रोख रक्कम असलेली अज्ञात महिलेची पर्स गॅरेज समोर रस्त्यावर सापडल्यानंतर पैशाचा व दागिन्यांचा मोह न ठेवता गॅरेज चालकाने ती प्रामाणिकपणे बार्शी शहर पोलीस ठाण्यात जमा केली. राजू रशीद मोमीन (वय ५० रा. ४२२, गाडेगांव रोड बार्शी ) असे त्या प्रामाणिक गॅरेज चालकाचे नांव आहे. मंगळावर दि १९ रोजी दुपारी १.१५ च्या सुमारास ही घटना घडली.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

अधिक माहिती अशी: राजू मोमीन हे मंगळवार दि. १९ रोजी दुपारी १ च्या सुमारास त्यांच्या बार्शीतील परांडा रस्त्यावरील गांधी स्टॉप जवळ असलेल्या इंडिया गॅरेजमध्ये काम करत होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावर एक पर्स पडल्याचे दिसले. परंतु ती पर्स कोणाची आहे हे त्यांना समजले नाही. त्यांनी ती पर्स आणून दुकानात ठेवली. परंतु बराच वेळ वाट पाहूनही पर्स शोधत कोण आल्याचे दिसले नाही. त्यामुळे त्यांनी ती पर्स घेवून आपल्या पटेल नामक मित्रासोबत पोलीस ठाणे गाठले. तेथे त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार व ठाणे अंमलदार पो.ना. योगेश इंगोले यांची भेट घेवून घटनेची माहिती दिली. दोघांनीही प्रथम त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. त्यानंतर त्यांनी सपोनि इज्जपवार यांच्याकडे ती पर्स सुपूर्द केली. पर्सबाबत अधिक चौकशी पो.श्रीमंत खराडे करत आहेत.

पोलीसांचे आवाहन

शहरातील परांडा रस्त्यावर गांधी स्टॉपजवळ इंडिया गॅरेजसमोर दुपारी १.१५ च्या सुमारास ज्यांची पर्स हरवली असेल त्यांनी ती पर्स त्यातील ऐवजाची ओळख पटवून बार्शी शहर पोलीस ठाणे येथून घेवून जावी असे आवाहन सपोनि स्वप्नील इज्जपवार यांनी केले आहे.

कष्ट व प्रामाणिकपणावर आपला विश्वास : मोमीन

आपली एखादी गोष्ट हरवल्यानंतर त्याचे दु:ख काय असते याची मला जाणीव आहे. थोडया दिवसापूर्वी माझ्या पत्नीचे दागिने हरवले होते. त्यावेळी खूप दु:ख झाले होते. तसे दु:ख संबंधितांना होवू नये अशी आपली भावना आहे. कष्ट व प्रामाणिकपणावर आपला विश्वास आहे. त्यामुळे मी रोख रक्कम व दागिने असलेली पर्स परत केली.

  • राजू मोमीन, गॅरेज मालक, इंडिया गॅरेज, बार्शी

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here