बार्शी : जुन्या भांडणाच्या रागातून चुलत भावाने विळी मनगटावर मारुन जखमी केल्याची घटना घडली.
रविंद्र अशोक गोणेकर (वय ४७) रा. मल्लप्पा धनशेट्टी रोड, बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माझा चुलत भाऊ इंद्रजीत प्रमोद गोणेकर यांस दारुचे व्यसन असून जुनी भांडणे काढून नेहमी शिवीगाळी करुन भांडण करतो.

दि. ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचचे सुमारास मल्लप्पा धनशेट्टी रोडवरील माझे कुरिअरचे दुकान बंद करुन मी दुकानासमोर थांबलो असता, इंद्रजीत तेथे शिवीगाळी करत आला व भाजी कापण्याची लोखंडी विळी दाखवत मी कोणास सोडणार नाही असे म्हणत मारु लागला असता, मी उजवा हात मध्ये धरल्याने विळीचा वार माझ्या मनगटावर बसला. त्यामुळे जखम होऊन रक्त येऊ लागले. तो दुसरा वार करणार इतक्यात माझा चुलत भाऊ विशाल गोणेकर याने त्याच्या हातातून विळी ओढून घेतली. मी रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेत आहे. तसेच मला झालेल्या मारहाणीत माझ्या हाताला तीन टाके पडले आहेत.
या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.