पुण्यात चोरलेल्या बुलेट उस्मानाबाद जिल्ह्यात विकणारी टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात; चौघांना अटक, आठ बुलेट जप्त

0
953

ग्लोबल न्यूज – हिंजवडी, चिंचवड आणि पुणे परिसरातून महागड्या बुलेट दुचाकी चोरी करून त्यांची उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा येथे किरकोळ किमतीला विक्री करणारी एक टोळी हिंजवडी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. टोळीतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. तर अजून दोघांचा शोध सुरु आहे. अटक केलेल्या चोरट्यांकडून आठ बुलेट दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

सुमित सुनील सावंत (वय 19, रा. पारखेवस्ती, हिंजवडी), प्रशांत भीमराव गायकवाड (वय 19, रा. डांगेचौक, थेरगाव), चेतन उर्फ श्रीपती शिवाजी कातपुरे (वय 19, रा. लक्ष्मीनगर, थेरगाव), वैजनाथ नागनाथ चौधरी (वय 22, रा. देवगाव, ता. परांडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे साथीदार मर्फी उर्फ आशिष भिसे आणि फान्सीस (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांचा पोलीस शोध घेत आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपूर्वी हिंजवडी पोलीस ठाण्यात बुलेट दुचाकी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की, मारुंजी आणि हिंजवडी मधून बुलेट दुचाकी चोरून दोन चोरटे त्या बुलेट स्वतः वापरत आहेत. त्यातील एक चोरटा कोलते पाटील गेट जवळ थांबला आहे.

त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून सुमित सावंत याला हटकले. पोलिसांची चाहूल लागताच सुमित पळून जाऊ लागला. पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने एक बुलेट चोरी केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करून त्याच्याकडे आणखी कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे सांगितली. तसेच हिंजवडी, चिंचवड आणि वारजे माळवाडी परिसरातून बुलेट दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.

पोलिसांनी सुमितच्या अन्य तीन साथीदारांना अटक केली. चोरटे पुणे जिल्ह्यातून बुलेट दुचाकी चोरी करून त्या उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, परांडा येथे पाच ते दहा हजार रुपये किमतीला विकत होते. आरोपी फान्सीस याच्या मदतीने ही बुलेट विक्री केली जात होती. चोरट्यांनी परांडा येथील वैजनाथ चौधरी याला आणि अन्य लोकांना या बुलेट विकल्या होत्या.

आरोपींकडून आठ लाख रुपये किमतीच्या आठ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे हिंजवडी पोलीस ठाण्यातील पाच, चिंचवड पोलीस ठाण्यातील एक आणि वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण सात वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सुमित सावंत हा रेकोर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर पाच गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त विनायक ढाकणे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहाय्यक निरीक्षक सागर काटे, पोलीस कर्मचारी मारणे, किरण पवार, शिंदे, आतिक शेख, कुंभार, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, राणे, पालवे, गडदे, चव्हाण, कोळी, गुमलाडू यांच्या पथकाने केली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here