बार्शी: श्रद्धा अन् अंधश्रद्धेच्या चाकोरीतून समाजातील अनेकजण जात असताना, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे लॉकडाउनमध्ये अंधश्रद्धेचा कहर झाला आहे. “कोविड-19 या विषाणूची चेन्नई येथून देवी आली’ असे म्हणत कोरोना देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. देवीला नैवेद्य, कोंबडी, बकरे बळी दिल्याने कोरोना झालाच नाही असे ठामपणे सांगितले जात आहे.

याप्रकरणीएका महिलेसह दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.ना मास्क वापरला, खोकला नाही, सर्दी नाही, हातही धुतले नाहीत, असे सोलापूर रोड, पारधी वस्तीमधील नागरिक सांगत आहेत. बार्शी शहर पोलिसांना या घटनेची माहिती समजताच सोलापूर रोड, पारधी वस्ती येथे जाऊन पाहणी केली. देवीची प्रतिष्ठापना पाहिली, रहिवासी महिला व पुरुषांची माहिती घेऊन एका महिलेसह दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमनाथ परशुराम पवार (वय 42), ताराबाई भगवंत पवार (वय 52, दोघेही रा. सोलापूर रोड, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस रविकांत लगदिवे यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना 30 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान घडली.

देवीला मरेपर्यंत मानणार, सेवा करणार
आमच्यावर देवीची कृपा आहे, आम्ही मागील अडीच महिन्यांपासून तोंडाला मास्क लावत नाही, हात धूत नाही अथवा आम्हाला सर्दी, खोकलाही झाला नाही. आमचे मुंबई, पुणे येथे नातेवाईक आहेत. सेवा केली, पूजापाठ केला, बकरे, कोंबडी नैवेद्य दाखवले अन् देवीने सुखी ठेवले, असे येथील महिला सांगत आहेत. “ओटी भरल्यास रुग्ण बरा होतो, मी रुग्णालयातून देवीमुळेच घरी परत आले. कोरोना बाईचा आशीर्वाद आम्ही विसरू शकत नाही. देवीला मरेपर्यंत मानणार, सेवा करणार, आयुष्यभर सांभाळणार’ असे ठाम मत व्यक्त करण्यात येत आहेत.
एका ठिकाणी टाईल्स फरशीचा छोटासा कट्टा करून, दुसऱ्या एका ठिकाणी लहान गोलसर दगड ठेवून, आणखी एका ठिकाणी अनेक फोटोंसह देव्हारा असलेल्या देवघरात लिंबू ठेवून कोरोना देवीची स्थापना झाली आहे. कोरोना महामारीमुळे कोरोनाआईची स्थापना व पूजन केल्याचे तेथील नागरिकांनी सांगीतले असून देवीच्या सेवेने आमचे वाईट होणार नसल्याची त्यांची श्रध्दा आहे
कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातल्याने वैद्यकिय यंत्रणा, शासन आणि प्रशासन त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. परंतु बार्शीतील पारधी समाजाने २१ व्या शतकात देखील कोरोनाचा बिमोड करण्यासाठी कोरोना देवीची स्थापना करून त्याचे पूजन केल्याने त्यांचा अशिक्षीतपणा उघड झाला आहे. देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी शास्त्राच्या प्रगतीतून भारताला जगातील महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले होते.असे असताना असे प्रकार घडत आहेत.
अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी या भागातील नागरिकांचे प्रबोधन
याबाबत बार्शी शहर पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी म्हणाले, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम, अफवा पसरवून कोरोना रोगाचा प्रसार करणे यानुसार दोघांवर गुन्हा दाखल केला असून अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी या भागातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत आहे.

देवाच्या दयेने आम्हाला सर्दि नाही ना खोकला नाही ना कसला त्रास नाही, इथे आम्ही कोरोनादेवीची स्थापना केली आहे. दर सणाला नैवेद्य, उद, कापूर, दिवे लावायचे आणि पाया पडायचे, देवीमुळे आमच्या केसालाही धक्का लागत नाही, ज्याचा त्याचा मान दिला तर काही होत नाही. कोराेनामुळे मयत झाल्यावर हात लावू देत नाही, पॅक करून देता, किडण्या काढून घेता की काय हे माहित पडत नाही.
- पाराबाई भगवान पवार
करूनाबाईने मला कोरोनामधून वाचविले,
- साहेल परशू काळे
करूनाबाईसाठी काेंबडे कापले जातात, देवासाठी हा प्रकार होतो.
- बाली सोमनाथ पवार
आमचा रोग जावा, सुख मिळावे म्हणून करूनाबाईला इथे जागा दिली. देवाच्या क्रपेमुळे ताेंडाला कपडे लावायची गरज नाही.
- सोमनाथ परशूराम पवार
या जागेवरच करूणादेवीची स्थापन केली, आम्ही तिला मरेपर्यंत माननार, आखाडाच्या महिन्यापासून हे सुरू आहे. यापुढेही आयुष्यभर सांभाळणार, देवीपासून आमचे चांगले.
- कमलाबाई रोहिदास पवार
आमच्या नातीला दिसली, तोंडाला कपडा बांधून ती आली होती. मला जागा द्या म्हणाली, देवळापाशी जागा दाखवते म्हणाली.
- चंपाबाई बाबू काळे
अंधश्रद्धेचे निर्मूलन, उच्चाटन केले पाहिजे
अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बाशीचे सचिव विनायक माळी म्हणाले, मनाच्या भावनेतून देवीची प्रतिष्ठापना झालेली आहे. अंधश्रद्धेतून आर्थिक, शारीरिक व मानसिक शोषण होत आहे. शासनाने अंधश्रद्धेचे निर्मूलन, उच्चाटन केले पाहिजे. कोरोना विषाणू आहे हे जागतिक संघटनेने म्हटले आहे.