दिनांक : ११ऑगस्ट; गुरुवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
बार्शी: प्रपंचामध्ये सुखानंतर दु:ख आणि दु:खानंतर सुख ही निरंतर चालणारी सामाजिक प्रक्रिया आहे. अनादी काळापासून सुरु असलेले हे सुख आणि दु:ख म्हणजेच मनुष्याच्या जीवनाचा प्रपंच होय. असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.

ते श्रावणमास प्रवचनमालेच्या १४व्या दिवशी तुकाराम महाराजांच्या जीवनात सुखानंतर दु:ख कसे निर्माण झाले? याविषयी निरुपण करित होते.
संत तुकाराम महाराजांचा इतका सुखी संसार सुरु असताना त्यांच्या पदरी अनेकानेक संकटे येत राहिली. जसे आकाशातील ढग हे कायम राहत नाहीत ,तर ते कालांतराने निघून जातात. त्याप्रमाणे सुख-दु:ख हे कायम टिकणारे नसते.

गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज जेष्ठ साहित्यिक डॉ. निर्मलकुमार फडकुले यांचे बोल सांगतात की, प्रपंचामध्ये मिळालेला आनंद कायम टिकून राहत नाही. परमार्थामध्ये एकदा मिळालेला आनंदाचा क्षण कायमच टिकून राहतो. प्रपंचामध्ये त्याच त्याच गोष्टी नको वाटतात आणि परमार्थामध्ये त्याच गोष्टीतील गोडी वाढत जाते. पाण्यावर आलेला तरंग हा कालांतराने नष्ट होतो. तसे प्रपंचातील सुख-दु:ख आहे.

अनुकूल काळात संत तुकाराम महाराजांच्या जवळ मित्रपरिवार, नातेवाईक, गावातील लोक येत परंतु, प्रतिकूलतेत हे कोणीही जवळ येईना. संत तुकाराम महाराज पांडुरंगाला विनवणी करतात, मला आता तुझ्याशिवाय कोणीही नाही. या परिस्थितीवर मार्ग काढत तुकाराम महाराजांनी ४ बैलावर शेती करण्याचे ठरविले, परंतु, जनावरांचा रोग आल्याने ३ बैले मरुन गेली. तुकाराम महाराज फार निराश झाले. रुक्माई संत तुकाराम महाराजांना विचारते असे का होत आहे. पांडुरंग आपल्याला या दु:खातून बाजूला का काढत नाही. संत तुकाराम म्हणतात, पांडुरंग आपली कसोटी पाहतोय.
पुढे यावर मार्ग काढत संत तुकाराम महाराज दुकानदारीतला माल बाहेरगावच्या बाजारात विकून व्यवसाय करायचा असे ठरविले. परगावी रात्री भजन केले. सोबती निघून गेले. तुकाराम महाराज एकटेच रस्ता शोधत परतू लागतात. रात्री पाऊस चालू असतो. रस्त्यावरच्या खड्ड्यात बैलाच्या अंगावर असलेली गोणी पडते. ती गोणी एकट्याला उचलता येत नव्हती. त्यावेळी, साक्षात पांडुरंगाने येऊन मदतीचा हात दिला. नंतर इंद्रायणी काठी आल्यावर पावसामुळे नदीला भरपूर पाणी आले होते.

पांडुरंगाने बैलाच्या पायाखाली सुदर्शन चक्र लावले आणि नदी पलीकडे नेले. घरी गेल्यानंतर गोठ्यात बैल बांधण्यासाठी जातात तेवढ्यात तो मनुष्य गायब होतो. हा साक्षात पांडुरंगच आहे. कारण, असे येणे-जाणे हे फक्त भगवंत करु शकतात, असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी सांगितले.