दिनांक : २२ऑगस्ट; सोमवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
ज्ञान मिळवायचे असेल तर गुरूसेवा महत्त्वाची – जयवंत बोधले महाराज
पवित्र श्रावण महिन्यातील शेवटच्या श्रावणी सोमवारचा सुयोग;प्रवचनमालेच्या २५व्या दिवशी संत तुकाराम महाराजांना गुरुकृपा झाली, म्हणजे काय हे सांगितले गेले.

बार्शी: गुरुकृपा झाली अर्थात उपदेश झाला. अगदीच सोप्या शब्दात सांगायचे झाले तर, उपदेश म्हणजे मानवी जीवनाच्या हिताच्या सांगणे होय. हा उपदेश केवळ मनुष्य जीवाला असण्याचे कारण हेच की, त्याच्या अंगी विसराळूपणा आहे. तेव्हा, कालांतराने विसरलेल्या गोष्टींचे स्मरण करुन देण्यासाठी उपदेश करावा लागतो. असे विवेचन गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी केले.
प्रस्तुत उपदेशाचे तात्विक चिंतन गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज ३ पध्दतीने स्पष्ट करतात.
१) प्रभूसंमित उपदेश –
मालकाने नोकराला उपदेश करावा, तू असे कर.
२) सूरदसंमित उपदेश–
एका मित्राने दूस-या मित्राला उपदेश करणे, तू असे करावे असे मला वाटते.
३) भार्यासमित उपदेश–
बायकोने नव-याला उपदेश करावा, तूम्ही असे करताय ना!

पुढे विस्तार करताना कृपेचे ३ भिन्न प्रकार मांडतात-
१) हस्तकृपा –
गुरुंनी शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून केलेला उपदेश, हस्तकृपा होय.
२) दृष्टीकृपा–
गुरुंनी केवळ शिष्याकडे पाहणे, म्हणजे दृष्टीकृपा होय.
३) आलिंगन कृपा–
गुरुंनी शिष्याला आलिंगनाच्या माध्यमातून उपदेश करावा, ती आलिंगनकृपा होत.


गुरुकृपा होण्यासाठी गुरुसेवा करा , हा एकमेव मार्ग सांगितला जातो. ज्ञान मिळवायचे असेल तर सेवा महत्त्वाची आहे.
जेथ ज्ञानाचा कुरुटा। तेथ सेवा हा दारवंठा। परंतु, ही सेवा करताना अहंकाराचा यत्किंचितही स्पर्श न व्हावा. ज्ञानी माणसाला जसा विद्वतेचा अहंकार होण्याची शक्यता आहे. तसा सेवेचाही अहंकार होण्याचा संभव नाकारता येत नाही. सेवा करताना सेवक सेवारुप होणे, ही सेवाधर्माची उच्चतम पातळी संबोधतात.

संत तुकाराम महाराजांना पांडुरंगाने स्वप्नात उपदेश करण्याचे कारण काय बरे? जागृती मध्ये का केला नाही? याचे श्रद्धेच्या दृष्टीने भावनिक उत्तर सांगितले जाते की, संत तुकाराम हे साक्षात ब्रह्म आहेत. पांडुरंगाला भिती वाटली व देवाने याकरिता म्हणून स्वप्नात उपदेश केला. तसेच, तात्विक तर्कशास्त्राने पांडुरंगाने जेव्हा तुकाराम महाराजांना उपदेश करताना डोक्यावर हात ठेवल्यावर लगेच देहभान हरपावा, भाव समाधी लागावी. अशी होणारी अवस्था ही जागृतीमध्ये उपदेश केल्याचे प्रतिक आहे.
या उपदेशामध्ये संत तुकाराम महाराजांना जेवणात पावशेर तूप पांडुरंगाने मागितले.
भोजना मागती तूप पावशेर
हे तूप द्रवरुप स्निग्ध पदार्थ आहे. ते अतिव मृदू आहे. मन, बुद्धी, अहंकार व चित्त हे अंत:करणाचे ४ भाग ;या ४थ्या भाग असलेल्या चित्ताचे वैशिष्ट्य मृदू सांगितले जाते. या चित्ताच्या ठिकाणी एकमात्र मला धारण कर. म्हणजे विकार सर्वाेतोपरी नष्ट होऊन जातात. माघ शुद्ध दशमी वार गुरुवार या दिवशी पांडुरंगाने रामकृष्णहरि असा मंत्र देऊन उपदेश केला. तुकाराम महाराजांची परमार्थमार्गातील गोडी, अवस्था उत्तरोत्तर उंच होत होती. महाराजांच्या किर्तनात रंग येत होता. पुष्कळ जनसमुदाय महाराजांचे किर्तन ऐकण्यासाठी आवर्जून उपस्थित होत होता.

यादिवशी आवर्जून संत तुकाराम महाराजांचे चरित्र गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांच्या मुखातून श्रवण करण्याचा आनंद मिळावा म्हणून जय सच्चिदानंद मंडळ, नागपूर येथून २० जण आवर्जून उपस्थित होते. बार्शीतील श्रावणमास प्रवचनमालेचे हे वैभव पाहून ते भारावून गेले . प्रतिवर्षी येण्याची इच्छा व्यक्त करत प्रसन्न मनाने बार्शीकर मोठे भाग्यवान आहेत की, त्यांना गुरुवर्य डॉ. जयवंत महाराजांचा सहवास संपूर्ण श्रावणमास आहे, असे उद्गार काढले.