‘गुगल’कडून येत्या पाच ते सात वर्षांमध्ये हिंदुस्थानात 75 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येईल, अशी घोषणा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी केली आहे.

सुंदर पिचाई यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या बैठकीनंतर पिचाई यांना ‘गुगल फॉर इंडिया’च्या वार्षिक कार्यक्रमात ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. यावेळी पिचाई यांनी पंतप्रधान मोदी, माहिती प्रसारणमंत्री रविशंकर प्रसाद यांचे आभार मानले.
काय म्हणाले पिचाई

गुगल फॉर इंडिया मोहिमेअंतर्गत 10 अब्ज डॉलर्स (सुमारे 75 हजार) कोटी हिंदुस्थानात पाच ते सात वर्षांमध्ये गुंतवण्यात येतील.हिंदुस्थानच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न आहे. गुंतवणूक ऑपरेशन आणि डिजीटल क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करेल.

हिंदुस्थानने डिजीटल व्यवहार आणि मोबाईल इंटरनेटने मोठी झेप घेतली असली तरी अद्यापही हा प्रवास सुरु आहे. लाखो लोक या स्वस्त इंटरनेटपासून दूर आहेत. सर्व लोकांना व्हॉइस इनपूटची सेवा, हिंदुस्थानी भाषांमध्ये कम्प्युटिंगचा पर्याय देण्याचे काम बाकी आहे. या गुंतवणुकीचा हिंदुस्थानी जनतेला निश्चितच लाभ होईल.

2020च्या अखेरपर्यंत 22 हजार शाळांमध्ये 10 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सीबीएसई बरोबर भागीदारी केली आहे. प्रसारभारतीबरोबरही गुगल काम करणार आहे.