घारीला लागला जीव वाचवणार्या पक्षीमित्राचा लळा ; माणसाळलेली घार
माणसाळलेली घार
सोलापूर : शहरापासून २५ किलोमीटरवर दक्षिण सोलापूर तालुक्यातले बंकलगी हे गाव. याच गावात राहणारे मल्लिकर्जुन धुळखेडे यांची ही गोष्ट. 38 वर्षीय मल्लिकार्जुन, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील, जिल्हा अापत्ती व्यवस्थापन विभागात जीवरक्षक म्हणून कार्यरत. गेल्या दोन वर्षापासून मल्लिकार्जुन धुळखेडे यांच्या अंगणात एका ब्राम्हणी घारीचा मुक्त विहार पाहायला मिळतोय.

निसर्गात मनमुराद मुक्त विहार करणार्या घारीला चक्क जीव वाचवणाऱ्या पक्षीमित्राचा लळा लागला आहे. होय हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की घारीची माणसाशी मैत्री होऊ शकते का ? तर याचे उत्तरं होय असेच आहे. पक्षीमित्र आणि या घारीमध्ये आता मैत्रीचं घट्ट नातं निर्माण झालं आहे.
झाले असे की, अक्कलकोट येथील सुलेरजवळगे या गावात ब्राम्हणी घारीचे पिल्लू उष्मघाताने बेशुद्ध अवस्थेत पडले होते. घारीच्या मदतीसाठी मल्लिकार्जुन यांनी तिकडे धाव घेतली. प्रथमोपचार करून तिला घरी घेऊन अाले. मांजर किंवा कुत्रासारख्या प्राण्यांपासून तिचे संरक्षण व्हावे, यासाठी खास पिंजऱ्याची देखील व्यवस्था केली. त्यांनी आपल्या व्यस्त अशा दिनक्रमातही तिला अनेक दिवस घरात ठेवून तिच्यावर उपचार केले. घारीला लागणारा मांसाहार ते देऊ लागले.

तब्बल सहा महिने तिच्यावर उपचार केल्यानंतर ती बरी झाली. त्यानंतर तिला निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. पण काय पुढे आश्चर्यच घडले. माणसाळलेली ही घार निसर्गाच्या सानिध्यात जाण्याऐवजी ती मल्लिकार्जुन यांच्या घराच्या आसपास राहू लागली. पुढे ही घार मोठी झाल्यानंतर घराबाहेर सोडले तेव्हा न चुकता सायंकाळीही घार पुन्हा घरी आली आणि हा नित्यक्रम बनला.
रोज सकाळी बाहेर पडणं आणि सायंकाळी पुन्हा आपल्या या घरट्याकडे परत येणं हा तिचा दिनक्रम बनला. त्यानंतर त्या दोघांचा जिव्हाळा आजतागायत अविरत राहिला आहे. दिवसभर निसर्गातून विहार करून आल्यानंतर ही घार संध्याकाळी अापल्या मित्राला भेटण्यासाठी येत असते. संकटात दिलेल्या मदतीची जाणीव या घारीने देखील ठेवली अाहे. पक्षी व प्राणी प्रेमी असल्याकारणाने मल्लिकार्जुन यांनी अनेक रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून अनेक पशुपक्षांचा जीव वाचवला आहे.


चौकट
शीळ वाजवताच येते धावून
तसे पाहायला गेले तर घर ही माणसाच्या कधी जवळ येत नसते. मात्र ही ब्राह्मणी घार मल्लिकर्जुन यांच्या अंगाखांद्यावर खेळत असते. ते शीळ वाजवताच ही ब्राह्मणी घार मल्लिकार्जुन यांच्या अंगा खांद्यावर बसते. तेव्हा ते पाहून इतरांना देखील आश्चर्य वाटते. उडत असताना किंवा स्वस्थ बसली असताना मधून मधून घार चीं ऽऽ हि ऽ ही, चीं ऽऽ हि ऽऽ ही असा एक प्रकारचा सुरेल आवाज काढते.
कोट
अनेक पशुपक्षांचा वाचवला जीव
उष्माघाताने बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या या घारीवर सहा महिने उपचार करून वाचवले आहे. याचा मला मनस्वी आनंद होत अाहे. शीळ वाजवल्यानंतर तिला मी खायला मांसाहार देणार आहे, याची चुणूक लागते आणि तो माझ्याकडे धावत येतो. यापूर्वीही मी अनेक पशुपक्षांचा जीव वाचवला आहे.
मल्लिकार्जुन धुळखेड – पक्षी मित्र
