गणेश चतुर्थी विशेष:गणपतीबाप्पाचे चित्र असलेल्या इंडोनेशियातील नोट संग्रहित ,विजय शिंदे यांच्याकडे दुर्मिळ नोटा अन् पोस्ट तिकिटांचा संग्रह
सोलापूर
कोणत्याही कामाच्या सुरुवातीला गणपती बाप्पाची पूजा करणे महत्त्वाचे मानले जाते. गणपती बाप्पाची पूजा फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात केली जाते. पण सर्वात विशेष गोष्ट म्हणजे गणपती बाप्पाचे चित्र हे इंडोनेशियाच्या चलनावर होते. जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश हा इंडोनेशिया आहे. याच देशातील अशी एक नोट संग्राहक विजय शिंदे यांच्या संग्रहात आहेत. ही नोट त्यांनी पत्रमैत्रीतून मिळवली अाहे.

भारताच्या अगदी जवळ असलेल्या इंडोनेशिया बिन सांप्रदायिक राष्ट्र म्हणून गणले जाते. येथे ख्रिश्चन अन् मुसलमान लोक बहुमतात आहे. तेथील लोक हव्या त्या देवाला भंजतात. मात्र येथील सरकार गणपतीची आराधना करते. प्रजेला दररोज आपल्या साऱ्या कामाच्या वेळी गणपतीचा दर्शन व्हावे यासाठी आपल्या देशाच्या चलनी नोटावर गजाननाचे चित्र त्यांनी छापले आहे. काही वर्षांपासून ही परंपरा चालू आहे की तिथे येणार्या कुठल्याही सरकारने अद्याप मोडले नाही. इंडोनेशियात गणपतीला शिक्षण, कला आणि विज्ञान याचा देव मानले जाते.
विजय शिंदे हे सुभाष गल्ली अक्कलकोट येथे राहणारे
५३ वर्षीय गृहस्थ. वयाच्या ८ व्या वर्षापासून त्यांनी नोटा गोळा करण्याचा छंद जोपासला आहे. आयर्लंड या देशात ‘पत्रमैत्री’ नावाची संस्था आहे. जगभरातील अनेक छंदिष्ट लोक या संस्थेचे सभासद आहेत. या संस्थेचे सभासद झाल्यानंतर ही संस्था छंद गोळा करणाऱ्या लोकांची माहिती एकमेकाला माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून पुरवते. विजय शिंदे यांनी या संस्थेचे सभासद झाल्यानंतर अनेक देशविदेशातील लोकांशी पत्राद्वारे संपर्क करू लागले.

पत्रव्यवहारातून विदेशातील संग्राहकांकडून संग्रहित असलेल्या नोटा आणि पोस्टाची तिकिटे शिंदे यांनी मिळवले. यामुळे शिंदे यांच्या संग्रहात वाढ होऊ लागली. या पत्रव्यवहारामुळे आज ते जगभरातील दोनशे लोकांशी संपर्कात आहेत. महिन्यातून दहा लोकांशी ते पत्राद्वारे संपर्क साधतात. आज जवळजवळ त्यांच्याकडे १३० हून अधिक देशातील जुन्या नोटा आणि २०० हून अधिक देशातील स्टॅम्पचा संग्रह आहे.


चौकट
नोटा अाणि टपाल तिकिटांचा संग्रह
इंग्लंड, अमेरिका, रशिया, इंडोनेशिया,जकार्ता, श्रीलंका, नेपाळ भूतान, बांगलादेश, म्यानमार, आयर्लंड, स्कॉटलंड अाणि हॉलंड
या देशातील चलनात असलेल्या व नसलेल्या नोटा आणि पोस्ट स्टॅम्पचा खजिना त्यांच्याकडे अाहे. १८९८ सालापासूनच्या पाच रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंतच्या जुन्या नोटा त्यांच्या संग्रहात पाहायला मिळतात. भारतासह विदेशातील एकूण पन्नास हजार पोस्ट स्टॅम्प त्यांच्याकडे आहे.

चौकट
छंदात रमलय कुटुंब
छंदवेड्या विजय यांना पत्नीसुद्धा छंद प्रेमातूनच लाभली हे विशेष. विजय यांची पत्नी नंदा, मुलगा अक्षय, मुलगी किरण या सर्वांनाच तिकीट आणि नाणी संग्रहाचा छंद आहे. अवघे कुटुंब या छंदात रंगलंय. विजय यांच्या घड्याळ दुरुस्तीचे दुकान आहे. व्यवसायातून मिळालेला वेळ ते छंद जोपासण्यासाठी देतात.