बार्शी : अॅमेझॉन ई-स्टोअरची फ्रँचायसी घेवून त्या वस्तूंची विक्री ऑफलाईन तसेच ऑनलाईन करून ग्राहकांना विकून त्यात तुम्हाला १८ टक्के, १२ टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवून एकाची ४ लाख ९७ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात बार्शी तालुका पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोपट उमेश गुंजाळ रा. वांगी, ता. भूम यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. अब्दुल रेहमान व आलोक (पूर्ण नांव माहित नाही) (दोघे रा. प.बंगाल )अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. दि. २९ सप्टेंबर २०२१ ते १५ ऑक्टोबर २०२१ च्या दरम्यान वेळोवेळी अलिपूर गावचे हद्दीतील पेट्रोल पंप येथे सदरची घडली.

आरोपींनी फिर्यादीस तुम्ही अॅमेझॉन ई स्टोअरची फ्रँचाइसी घेवून विक्रीसाठी ज्या वस्तू असतात त्या तुम्ही ऑफलाईन तसेच ऑनलाईन सेल करून ग्राहकांना विकू शकता. त्यात तुम्हाला १८ टकके, १२ टक्के कमिशन घेवू शकता असे आमिष दाखवून फिर्यादीकडून दि. २९ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर रोजीच्या दरम्यान वेळोवेळी रजिस्ट्रेशन फी १५,५०० रूपये, अॅग्रीमेंट करण्यासाठी ३८,७५० रूपये, सेटलमेंट अकाऊंट ओपनिंगसाठी ८५ हजार रूपये, मिनी फ्रँचायसी फी करिता १ लाख ५५ हजार रूपये, ट्रान्स्पोर्टिंगसाठी ९४,७६० रूपये व जीएसटी साठी १,०८,०९० रूपये असे एकूण ४ लाख ९७ हजार १०० रुपये फोन पे त्यांचे दिलेल्या अकाऊंट नं. ७५६६२०१००१०६२८ या भरण्यास सांगून फिर्यादीची फसवणूक केली. अधिक तपास सपोनि शिवाजी जायपात्रे करत आहेत.