बार्शी (प्रतिनिधी)- शुक्रवारी अन्न प्रशासन विभागास मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे अन्न प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती नसरीन मुजावर यांनी ज्ञानेश्वर दत्तात्रय करळे यांच्या मालकिच्या बार्शी तालुक्यातील भोईंजे येथील मे. अक्षय डेअरी या ठिकाणी अचानक छापा टाकला असता सदर ठिकाणी व्हे परमिट, खाद्यतेल वापरुन दुधामध्ये भेसळ केली जात होती. त्या नंतर श्रीमती मुजावर, अन्न सुरक्षा अधिकारी यांनी भेसळयुक्त दुध या अन्न पदार्थाचा नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित दुध-640 लिटर, किंमत रुपये- 19200/-, सुर्यफुल तेल- 23.4 किलो किंमत रुपये- 3774/- व व्हे परमिट पावडर- 456 किलो, किंमत रुपये- 72960/- असे एकूण एकत्रित किंमत रुपये- 95934/- चा साठा जप्त करुन ताब्यात घेतला.

तसेच सदरचे भेसळयुक्त दुध हे नाल्यामध्ये ओतुन नष्ट केले. सदरची कारवाई अभिमन्यु काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई व सह आयुक्त (पुणे विभाग), पुणे शिवाजी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रदिपकुमार राऊत व अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती नसरिन मुजावर यांच्या पथकाने पुर्ण केली. बार्शी तालुक्यातील विविध डेअरीमध्ये चालणारा हा काळाबाजार या निमित्ताने उघड झाला आहे. बार्शी शहर तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यात कोठेही अशा भेसळयुक्त दुधाचा गैरप्रकार सुरू असल्यास तात्काळ अन्न प्रशासन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सहआयुक्त प्रदीप राऊत यांनी केले आहे.