बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. शरद पवार यांच्या घरावर झालेल्या दगडफेक हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेस बार्शी तालुक्याच्यावतीने तहसिलदार सुनील शेरखाने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार संजीवन मुंढे उपस्थित होते.
सदरील हल्यातील हल्लेखोरांचा खरा सुत्रधार हा कोण आहे हे शोधून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्याची मागणी या निवेदनातून केली असल्याचे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा अॅड. सुप्रिया गुंड यांनी सांगितले. यावेळी बार्शी तालुकाध्यक्षा अॅड दैवशाला जाधवर उपस्थित होत्या.

गुंड म्हणाल्या, एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर, कोणाच्या पोटात दुखले की, खा. पवार यांच्या घरावर हल्ला करण्याचं षडयंत्र रचून बनावट एसटी कर्मचारी पाठवून घरावर दगडफेक केली. विरोधकांना माहित आहे की, ईडी सारख्या संकटाना महाविकास आघाडीचे मंत्री घाबरत नाहीत, महाविकास आघाडी सरकारचे आधारस्तंभ खा. पवार यांच्यावरच घाला घातला तर सरकार पडेल अशा कटकारस्थानातून विरोधकांनी त्यांचे हल्लेखोर पाठवून हल्ला केला. एसटी कर्मचाऱ्यांनी कायद्याचा अवलंब करुन न्यायालयीन लढा द्यावा. एसटी कर्मचारी यांनी निवडलेले नेतृत्व गुणरत्न सदावर्ते हे भाजपची राजकारणाची पोळी भाजण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्याशी आणि आयुष्याशी खेळत आहेत असा आरोपही गुंड यांनी यावेळी केला.