बार्शी: बार्शीत वाढत चाललेला कोरोना, तालुका प्रशासनात नसलेला ताळमेळ, आमदार राजेंद्र राऊत व खासदार ओमराजे निबाळकर यांनी जिल्हा प्रशासन व पालकमंत्री यांच्याकडे केलेल्या तक्रारीची तात्काळ दखल घेत विभागीय आयुक्त दीपक म्हेसेकर यांनी आजच दिलेल्या पत्रानुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी तात्काळ बार्शीचे तहसीलदार प्रदीप शेलार यांचा पदभार काढून घेत सोलापूर येथील निवडणूक तहसीलदार डी एस कुंभार यांच्याकडे तहसीलदार पदाचा अतिरिक्त पदभार पुढील आदेश येईपर्यंत सोपवला आहे.

या पत्रात विभागीय आयुक्त यांनी प्रशासकीय व कोरोना विषयक कामकाज नव्या तहसीलदार यांच्याकडून प्राधान्याने करून घ्यावे असे म्हटले आहे. त्यानुसार कुंभार यांच्याकडे हा पदभार दिला आहे.
बार्शीचे मुख्याधिकारी शिवाजी गवळी हे मागील आठवड्यात अचानक रजेवर गेले होते.त्यामुळे प्रभारी मुख्याधिकारी म्हणून कुंभार बार्शीत काम पाहत होते.आज गवळी ही हजर झाले त्यामुळे कुंभार याना तहसीलदार म्हणून मुक्तपणे काम करता येणार आहे. बार्शीतील प्रशासनाची विस्कळीत झालेली घडी नीट बसवून समन्वयाने कामकाज करून कोरोनाचे वाढते संक्रमण रोखणे याला कुंभार यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे.


आरोग्य, महसूल, नगरपालिका आणि पंचायत समिती या सर्वांनी मिळून एकत्र काम केले तरच कोरोना कमी होणार आहे. आमदार राजेंद्र राऊत यांनी काल सोलापूर येथे झालेल्या बैठकीत बार्शीला जास्तीत जास्त रॅपिड अँटिजेन किट मिळावी अशी मागणी केली आहे. तसेच कवारन्टाईन सेन्टर उपलब्ध करून घ्यावेत. रुग्ण वाढत आहेत त्यामुळे नवीन हॉस्पिटल ताब्यात घ्यावेत अशी मागणी केली आहे.
त्या अनुषंगाने आज प्रांताधिकारी निकम आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी बार्शीत भेट देऊन मंगल कार्यालय आणि हॉस्पिटल ची पाहणी केली आहे. यावर ही तात्काळ निर्णय घेऊन हे सर्व उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे.
बार्शीतील वाढत्या कोरोनामुळे आता तहसीलदार यांची विकेट गेली असून आता यापुढे प्रांताधिकारी यांचा नंबर असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.