अखेर प्रशासन जागे; दि.०१ ऑगस्ट पासून उस्मानाबाद शहरात दुचाकीवर बंदी – जिल्हाधिकारी
उस्मानाबाद- कोव्हीड-१९ विषाणूंमुळे उद्धभवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याचे दृष्टीने प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याकरिता उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद नगरपालिका क्षेत्रात दुचाकी वाहनांना दि.०१ ऑगस्ट पासून प्रतिबंध करणेबाबत उस्मानाबाद च्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेश काढला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोव्हीड-१९ च्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये हि कोरोनाच्या प्रादुर्भावात वाढ होत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र शासनाचे आदेशानुसार दुचाकी वाहनांवर फक्त एक व्यक्तीस प्रवास करण्याची परवानगी असून अनेक दुचाकीस्वारांकडून यानियमांचे उल्लंघन होत असल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस विभाग व स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
या नंतरही नगर पालिका क्षेत्रामध्ये अनेक दुचाकी स्वरांकडून वारंवार नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अनावश्यककरिता बाहेर न पडणे गरजेचे असून अनेक दुचाकी रस्त्यावर अनावश्यक फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव वाढत असून तो रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये दुचाकींच्या वाहतुकीस प्रतिबंध करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे.


त्याअर्थी जिल्हाधिकारी उस्मानाबाद दीपा मुधोळ-मुंडे यांनी उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रामध्ये पुढील आदेशापर्यंत दुचाकींवर प्रतिबंध घातला आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून खालील बाबींसाठी दुचाकींना सवलत देण्यात आली आहे.
१) शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयात जाण्या येण्यासाठी ओळखपत्र आधारे दुचाकीवर प्रवासाची परवानगी राहील.
२) अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना व कोव्हीड-१९ चे प्रातिबंधाचे अनुषंगाणे नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी/ व्यक्तींना ओळखपत्र आधारे दुचाकीवर प्रवासाची प[परवानगी राहील.

उस्मानाबाद नगर पालिका क्षेत्रांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी व कोव्हीड१९ चे प्रतिबंधाचे अनुषन्गाने नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी/ व्यक्तींना नगर पालिकेने ओळख पत्र द्यावीत.
३) फिरत्या दूध विक्रेत्यांना दूध विक्रीसाठी दुचाकींचा वापर करण्यात परवानगी राहील. ४) तातडीच्या वैद्यकीय निकडीकरिता दुचाकींचा वापर करण्यास परवानगी राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना उपरोक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदर आदेशाची अमंलबजावी दि.०१ ऑगस्ट २०२० पासून लागू असे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले आहे