… त्या पावसानं सगळंच मातीमोल झालं, ज्ञानेश्वराचं आयुष्यच उघड्यावर आलं
बार्शी – तालुक्यात बुधवार 14 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस झाला. संतापलेल्या वरुणराजानं शेतीमालासह शेतकऱ्यांची स्वप्नही उध्वस्त केली. तालुक्यातील शेळगाव ( R) येथील युवा शेतकरी ज्ञानेश्वर ताकमोगे यांच प्रचंड नुकसान झालंय. पावसाच्या पाण्यानं त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्यात. कारण, कायमचा दुष्काळ हटवण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न, या अस्मानी संकटामुळे त्यांच्यासाठी जीवघेणा ठरलाय.

सततच्या नापिकीला अन दुष्काळाला तोंड देता देता ज्ञानेश्वर यांनी शेतात शेततळे निर्माण करण्याचा निर्णय घेतला, कायमचे दुष्काळासोबत दोन हात करण्याचे ठरवले. त्या नियोजनाने 1 वर्षापूर्वी शेतात शेततळ्याचा भराव घालण्यात आला, परंतु आर्थिक अडचणीमुळे तब्बल सहा महिन्यांनी तळ्यातील कागदाचे आच्छादन घातले. प्रयत्नाला यश आलं होतं, अगदी चार महिन्यांपूर्वीच शेततळे पूर्ण भरून घेतले व या शेतकरी मित्राच्या शेतीचा दुष्काळ पूर्णपणे मिटला.
मात्र, नियतीलाच हे पाहवंल नाही, बुधवारचीअतिवृष्टी झाल्यामुळे ओढ्याचे पाणी ओव्हरफ्लो होऊन शेततळे फुटले व क्षणात होत्याचे नव्हते झाले. चार लाख रुपये खर्चून बनवलेले शेततळे उध्वस्त झाले, त्यासोबतच पेरणी केलेला मत्स्यबीज व्यवसायही वाहून गेला. मोठं धाडस करून एका युवक शेतकऱ्याने सर्वकाही उभारलं होतं. पण, पावसाच्या रुपात काळच आला अन उद्योगाचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणाला नेस्तनाबूत करून गेला.

ज्ञानेश्वर यांनी दीड लाख रुपये खर्च करून तळ्यात मत्स्यबीज पालन सुरू केलं होतं, पण या पावसानं त्याचं सगळंच मातीत कालवलं. सोयाबीन गेलं, कांदाही गेला हाती फक्त फुटकं नशिब उरलंय. आता तर शेतातील विहिरही मातीनं बुजून गेलीय. या विहिरीचा गाळ काढायलाच लाख रुपयांचा खर्च होणारय.
दोन दिवसापासून महसूल विभाग ,कृषी विभाग ,आमदार यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या व मदतीचे आश्वासन दिले पण 4-5 लाखाच्या नुकसानीला 4-5 हजारांची ठिगळं लावून काय होणार. ज्ञानेश्वर यांना स्वतःला उभं राहायचंय, पण सोबतच आई, पत्नी आणि लेकराबाळांचं कुटुंबही चालवायचंय. म्हणूनच, आपल्या लाडक्या ज्ञानूच्या मदतीला त्याची मित्र मंडळी पुढं आलीय. आपल्या ऐपतीनुसार ते द्यानूला उभं करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
कारण, आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांचा मोटर पंप नादुरुस्त झाला की पहिला फोन शेतकरी ज्ञानूला करायचा. ज्ञानू लगेच सर्व साहित्य घेऊन शेतकऱ्याच्या विहिरीवर हजर व्हायचा. अगदी पंप विहिरीतून काढण्यापासून ते पंप दुरुस्ती करून देऊन पंप सोडण्यापर्यंत सर्व मदत तो करायचा. आज, त्या ज्ञानूला उभं करण्यासाठी गावातील मित्र धडपडत आहेत, मैत्रीच आदर्श उदाहरण हे गावकरी देत आहेत. पण, आभाळच फाटलय मग ते शिवणार तरी कसं हा सर्वात मोठा प्रश्नय ?
साभार बार्शी टाइम्स