धाराशिव जिल्ह्यात ओमायक्रॉनचा प्रवेश; बावी येथील दोघांचे अवाहल पॉझिटिव्ह
संयुक्त अरब अमिरातमधील शारजाह येथून धाराशिव तालुक्यातील बावी येथे आलेल्या एका 42 वर्षांच्या पुरुषासह आणखी एक व्यक्तीचा ओमायक्रॉन चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या बावी गावात कलम 144 लागू करण्यात आले असून संबंधित रुग्णांवर जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात उपचार सुरु आहेत.

धाराशिव तालुक्यातील बावी येथील एक 42 वर्षांची व्यक्ती संयुक्त अरब अमिरातमधील शारजाह येथील काही दिवसाच्या वास्तव्यानंतर परत देशात आली होती. मुंबई येथील विमानतळावर व्यक्तीची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली होती. चाचणी निगेटीव्ह आल्याने ते आपल्या गावी म्हणजेच धाराशिव तालुक्यातील बावी येथे आले होते. त्या व्यक्तीला आजाराची कोणतीच नलक्षे नव्हती. त्यानंतर नियमाप्रमाणे काही दिवसांनंतर स्थानिक आरोग्य यंत्रणेच्या वतीने पुन्हा त्या व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली होती. यावेळी करण्यात आलेली चाचणी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली.
या व्यक्तींच्या संपर्कातील 35 जणांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या. यावेळी दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. यावेळी नमुने ओमायक्रॉन तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्या तपासणी अहवाल बुधवारी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला. त्यात दोन अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये परदेशातून आलेल्या व्यक्तीसह त्यांच्या कुटुंबातील अन्य एका व्यक्तीचा समावेश आहे. एकूण चार जणांचे अवाहल तपासणी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यापैकी दोन व्यक्तींचे ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उर्वरित दोन व्यक्तींच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

बावीत कलम 144 लागू
बावी गावात जिल्हा प्रशासनाच्या वतीने कलम 144 लागू करण्यात आले आहे. बावी गावापासूनचा तीन किलोमीटरचा परिसर रेड झोन तर सात किलोमिटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. तसेच गावच्या सिमा सिल करण्यात आल्या असून प्रशासन स्थितीवर नजर ठेवून आहे.
ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णाची तब्येत स्थिर
ओमायक्रॉन पॉझिटीव्ह रुग्णांवर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्या व्यक्तींची तब्येत स्थिर व व्यवस्थीत आहे. तसेच दुसऱ्या रुग्णालाही आयसोलेट करण्यात आले असून त्याचीही तब्येत स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.