विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा, टपोरे थेंब असे अक्राळ- विक्राळ रूप धारण करीत रविवारी मध्ये रात्री परतीच्या पावसाने निरोप घेत संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह बार्शी तालुक्यात पावसाने आकांड- तांडव केले.

राज्यात काही दिवस पावसाचा खंड पडला होता. मात्र, बंगालचा उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. तसेच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीजवळ असलेले चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी वातावरण बनत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस राहणार आहे.
शनिवारी सायंकाळपासून तालुक्यात पावसाने सुरुवात केली होती. सुरुवातीला हलका वाटणाऱ्या पावसाने काही मिनिटात उग्र रूप धारण केले. विजांचा कडकडाट, सुसाट्याचा वारा आणि टपोरे थेंब घेत रात्रभर धुमाकूळ घातला. तडाख्यात डाळिंब, लिंबू, सीताफळसह फळबागा तर खरिपातील तूर, कपाशी, मका आणि ऊस पिके भुईसपाट झाले.

बार्शी शहर व तालुक्यात परतीच्या जोरदार पावसाने सर्वदूर हजेरी लावली. दुपारी पडलेल्या या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यावर व सखल भागात व ग्रामीण भागात शेतात सर्वदूर पाणी साचले होते.या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीस आलेल्या सोयाबीन व मका पिकासोबत कांदा पिकाला ही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

शनिवारी रात्री ही तालुक्यातील बहुतांश भागात जोरदार पाऊस पडला. हवामान खात्याने ही चार दिवस मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. आज दुपारी मुसळधार पावसाने बॅटिंग केली. सुमारे दोन तास हा पाऊस सुरू होता. रात्रीपर्यंत हा पाऊस अधूनमधून पडतच होता.

बार्शी तालुक्यात मागील महिन्यात पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. तालुक्याची सरासरी 528.1 आहे .मात्र 11 ऑक्टोबपर्यंत तालुक्यात 698.3 मि मी पाऊस पडला आहे. हा पाऊस सरासरीच्या 126.1 टक्के आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या घास निसर्गाच्या प्रकोपात हिरावून नेला. रब्बीची नुकतीच पेरण्यात आलेली ज्वारीच्या पिकाला बाधा पोहोचली आहे. दिवसभर उभे असलेले पीक सकाळी सपाट झालेलं होत हे दृश्य डोळ्यात पाणी आणीत शेतकरी पाहत होते.