परंडा नगरपालिका क्षेत्रात 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू ; वाचा अशी असेल नियमावली

0
637

परंडा नगरपालिका क्षेत्रात 13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत संचारबंदी लागू ; वाचा अशी असेल नियमावली

उस्मानाबाद,दि.11: कोरोना विषाणू कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने शासनाने संपूर्ण राज्यात दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. लॉकडाऊन मधील निर्बंधांची सुलभता आणि लॉकडाऊन टप्पानिहाय उघडणे (Easing of restrictions and phase wise opening of lockdown Mission Begin Again) बाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा नगर पालिका क्षेत्रात कोरोना विषाणू कोविड-19 या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व त्यावर नियंत्रण आणण्याची कार्यवाही करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी कोविड-19 विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी परंडा नगर पालिका क्षेत्रात संचारबंदी लागू करणे आवश्यक झाले आहे.

त्यामुळे जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1)(3), साथरोग अधिनियम 1897 च्या कलम 2 आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या सर्व संबंधित तरतुदी अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन उस्मानाबाद जिल्ह्यातील संपूर्ण परंडा नगर पालिका क्षेत्रात दिनांक 13 ऑगस्ट 2020 च्या 00.00 वाजेपासून ते दि.20 ऑगस्ट 2020 च्या मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे.

या कालावधीत नागरिकांना अनावश्यकरित्या घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या कालावधीत कोरोना विषाणूचा (Covid-19) होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा नगर पालिका क्षेत्रातील खालील आस्थापना वगळून उर्वरित आस्थापना बंद राहतील.

फिरते दूध विक्रेते यांच्यामार्फत घरपोच दूध, दूध पाकीटांची विक्री, वितरण करता येईल. परंतु एका ठिकाणी उभे राहुन दूध विक्री करता येणार नाही. घरपोच दूध, दूध पाकिटे वाटपाच्यावेळी कोरोना विषाणू कोविड-19 च्या अनुषंगाने सामाजिक अंतराचे पालन करावे. तसेच घरपोच दूध विक्रीची वेळ सकाळी 7.00 ते 10.00 पर्यत राहील. सर्व सरकारी व खाजगी रुग्णालये, दवाखाने व त्यांचेशी संलग्न मेडीकल स्टोअर्स चालू राहतील.

जार, वॉटर सप्लायर्स यांनी पाणी जारव्दारे वाटप न करता ग्राहकांकडील उपलब्ध भांड्यामधे पाणी द्यावे आणि त्यावेळेस सामाजिक अंतराचे पालन करावे. किंवा जार, वॉटर स्पलायर्स यांनी संपूर्ण जार ग्राहकास द्यावे व रिकामी जार परत न नेता त्याच जारमध्ये पुनर्भरणाची घरपोच सेवा द्यावी व सर्व जार, वॉटर सप्लायर्स कर्मचारी यांना त्यांचे ओळखपत्राआधारे परवानगी राहील.

घरगुती गॅस घरपोच सेवा देतांना गॅस कंपनीचा गणवेश परिधान करावा व त्यांचे गणवेश नसलेल्या कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत ठेवावे. वर्तमानपत्रे व माध्यमांविषयक सेवा चालू राहतील.

सर्व शासकीय कार्यालय व केंद्र शासनाचे सर्व विभागांची कार्यालये सुरु राहतील. या कार्यालयाचे, विभागांचे कर्मचारी कार्यालयीन ओळखपत्राव्दारे नगर पालिका क्षेत्रात प्रवास करु शकतील. संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक शासकीय कार्यालये वगळता इतर शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 10 टक्के राहील.

दिवाणी व फौजदारी न्यायालय परंडा येथील न्यायालयीन कामकाजास परवानगी राहील.परंडा नगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना इतर जिल्ह्यात व राज्यात जाण्यासाठी ऑनलाईन पास मिळणार नाही. तथापि अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसाठी परवानगी देण्यात येईल. यासाठी नागरिकांनी www. covid19. mhpolice. in या संकेतस्थळावर अर्ज करावा.

परंडा नगर पालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांनी कोरोना विषाणूचे अनुषंगाने (ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी व श्वसनास त्रास इ.) लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी.

विद्युत सेवा, मोबाईल व दूरसंचार सेवा पुरविणाऱ्या कंपन्या, आस्थापना व त्यांचे कर्मचारी वाहनांना ओळखपत्राआधारे परवानगी राहील. अंत्यविधीसाठी 10 व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी राहील.

पेट्रोल, डिझेल पंप फक्त अत्यावश्यक सेवा, मिडीया व वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वाहनांना व शासकीय वाहनांसाठीच सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत सुरु राहील. ओळखपत्राची पडताळणी करुनच पेट्रोल, डिझेल वितरित करण्यात यावे. पेट्रोल, डिझेल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेट्रोल, डिझेल पंप चालकांनी दिलेल्या ओळखपत्राअधारे परवानगी राहील.

पीक कर्ज व अंतर्गत कामकाजासाठी सर्व बँका सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत सुरु राहतील.
प्रशासनाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही धार्मिक यात्रा, मेळावे, लग्न समारंभ, विविध प्रकारचे प्रदर्शने, आठवडी बाजार, जनावरांचे बाजार भरविणे इ. आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

संचारबंदीच्या कालावधीत सर्व आस्थापनांनी कोविड-19 चे संसर्गाच्या तपासणीचे अनुषंगाने प्रशासनामार्फत रॅपिड अँटीजेन टेस्ट करुन घ्यावी.

या आदेशाची कडक अंमलबजावणी सर्व संबंधित यंत्रणांनी करावी. कुठल्याही व्यक्तीकडून या आदेशातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, जिल्हादंडाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी आदेशात नमूद केले आहे .

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here