व्यवसायासाठी भांडवल, प्लॉट, आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्याची तक्रार; बार्शीतील प्रकार,
व्यवसायासाठी भांडवल, प्लॉट, आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्याची तक्रार; बार्शीतील प्रकार,
बार्शी : ४० तोळे सोने घालून लग्न करुन दिलेल्या विवाहितेचा सासरच्या मंडळींनी व्यवसायासाठी भांडवल, प्लॉट, आणि चारचाकी वाहनाच्या मागणीसाठी छळ करुन त्रास दिल्याची तक्रार विवाहितेने पोलिसांकडे केली आहे.

निकीता प्रितम जगदाळे (वय २८) रा. फुले प्लॉट, फुले हाऊसिंग सोसायटी, बार्शी (हल्ली रा. मिरगणे हाईटस्, तेलगिरणी चौक, बार्शी) हिचे दि. ८ मे २०१७ रोजी आईवडिलांनी ४० तोळे सोने घालून तसेच संसारोपयोगी साहित्य देऊन हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे प्रितम सुभाष जगदाळे (वय ३३) यांचेशी लग्न करुन होते.
लग्नानंतर दोन चार दिवस चांगले नांदविल्यानंतर सासूने लग्नात दिलेले देवघर बदलून घेऊन ये, नणंदेने तुझ्या बापाकडून चार चाकी गाडी आण अशा कारणावरुन त्रास देणे सुरु केले. नंदाव्याच्या नोकरीसाठी तिच्या गळ्यातील मोठे मंगळसूत्र मोडून पतीने पैसे दिले.
सासरच्या मंडळींनी पहिल्या दिवाळीला माहेरी जाताना चारचाकी गाडी आणि ५ तोळे सोन्याचे ब्रेसलेट घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी तिच्या आईवडिलांनी ५ तोळे सोन्याचे ब्रेसलेट घातले.

आईवडिलांनी घातलेले ३० तोळे सोने पतीने मोडून टाकले, तसेच इतर नातेवाईकांनी घातलेले १० तोळे सोने फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले.
पती प्रितम याने त्याची बहिण, भाऊ, आई वडिल आणि मेहुणा लक्ष्मीकांत यांच्या सांगण्यावरुन तिला अनेक वेळा मारहाण करुन शिवीगाळी, दमदाटी केली. नणंद आणि नंदावा यांनी पती प्रितमला अनेक वेळा आमच्याकडे पैसे मागण्यासाठी फूस लावली.
मे २०२० मध्ये मुलगी झाल्यावर नणंद प्रियंकाने त्यावरुन टोचून बोलण्यास सुरुवात केली. बाळंतपणानंतर २ महिने माहेरी असताना पती, सासू व सासरे यांनी, तुझ्या आईच्या नांवे असलेला कुर्डूवाडी येथील प्लॉट द्या नसेल तर तानाजी चौकातील जागा प्रितमच्या नांवे करा, तसेच व्यवसाय करण्यासाठी अडीच लाख रुपये भांडवल म्हणून द्या नाही तर आम्ही तुला नांदावयास घेऊन जाणार नाही असे सांगितले.
त्यावर तिच्या आईवडिलांनी प्रतिष्ठीत मध्यस्थांमार्फत गेली २ वर्षे नांदावयास पाठविण्याचा प्रयत्न केला परंतु सासरचे लोक मागणीवर ठाम राहिले.
अशी फिर्याद निकीता प्रितम जगदाळे हिने प्रितम सुभाष जगदाळे (पती), वंदना सुभाष जगदाळे (सासू), सुभाष गोविंद जगदाळे (सासरे), पंकज सुभाष जगदाळे (दीर), प्रियंका लक्ष्मीकांत गलांडे (नणंद) व लक्ष्मीकांत गलांडे (नंदावा) सर्व रा. फुले प्लॉट, फुले हाऊसिंग सोसायटी, बार्शी यांचेविरुध्द दिल्यावरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. १८६० कलम ३२३, ३४, ४९८-अ, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.