सावधान : राज्यात करोना पुनः डोकं वर काढतोय !, दिवसभरात एक हजाराहून अधिक नवे रुग्ण
राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकदा हळूहळू वाढताना दिसत आहे. कारण, आज दिवसभरात राज्यात १ हजार ८१ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. या अगोदर काल राज्यात आढळलेल्या करोनाबाधितांची संख्या ही ७११ होती, ज्यामध्ये आज वाढ झालेली आहे.

आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,८८, १६७ एवढी झालेली आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ४ हजार ३२ अॅक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये २ हजार ९७० रुग्ण हे मुंबईतील आहेत.

याशिवाय आज दिवसभरात राज्यात ५२४ रुग्ण बरे होऊन घरी देखील परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,३६,२७५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०७ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज एकही करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,०९,५१,३६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,८८,१६७ (०९.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.