बार्शी – केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळमार्फत बार्शीत सुरु असलेली बार्शी टेक्सटाईल मिल लॉकडाऊन घोषणेपासून बंद आहे. त्यामुळे, ही मिल लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करत खासदार ओमराजे निंबाळकर , आमदार राजेंद्र राऊत व माजी आमदार दिलीप सोपल यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृतीजी इरानी यांना पत्र दिले आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांनी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र व्यवहार करून मिल सुरू करण्याची मागणी केली आहे. तर, खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इरानींना पत्र लिहले आहे. सध्या, संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार महोदय दिल्लीतच आहेत. दरम्यान, माजी मंत्री दिलीप सोपल यांनीही संबंधित मंत्र्यांना पत्र व्यवहार केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देश ठप्प झाला होता. मात्र, केंद्र सरकारने अनलॉक तर राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन म्हणत राज्यातील उद्योग सुरू केले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील उद्योग पहिल्याच टप्प्यात सुरू करण्यात आले. मात्र, बार्शीतील 400 कामगारांच्या कुटुंबाचा गाडा चालविणारी मिल अद्यापही बंदच आहे. त्यामुळे, कामगारांच्या रोजी-रोटीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बार्शी मिलमध्ये सद्यस्थितीत जवळपास 175 कायम, 60 बदली व 140 कंत्राटी कामगार काम करतात. मात्र, गेल्या 5 महिन्यांपेक्षा जास्त कालवधीपासून ही मिल बंद असल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने कायम व बदलीतील कामगारांना 50 टक्केच वेतन दिले जात आहे. मात्र, कंत्राटी कामगारांना जून महिन्यांपासून वेतन बंद केले आहे.
कामगारांवर हमालीची वेळ
मिल बंद असल्याने कित्येक कामगार इंडस्ट्री इस्टेटमध्ये कामाला जात आहेत, कुणी बिगारी काम करत आहे. तर कुणी मार्केट यार्डात कामाला जातंय. कुणी लहानमोठे व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे. मिलमध्ये 100 पेक्षा जास्त महिला कामगारही आहेत, त्यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून आहे. पण, मिल बंद झाल्याने त्यांच्यावरही मोठं संकट कोसळलं आहे. त्यामुळे, लवकरात लवकर मिल सुरू करण्याची मागणी कामगारांकडून होत आहे.