ब्रेकिंग :नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची अखेर बदली ;अभिजित बांगर नवे आयुक्त
आयएएस अभिजित बांगर यांनी स्वीकारला पदभार
नवी मुंबई : महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून सुरू झालेल्या नाट्यमय प्रकरणावर अखेर आज पडदा पडला.
आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची आज बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले आयएएस अभिजित बांगर यांनी आज सकाळी अचानक महापालिका मुख्यालयात भेट देऊन सर्वांना आश्चर्यचा धक्का देत पदभार स्वीकारला. यावेळी मिसाळ हे सुद्धा कार्यलयात होते. मिसाळ यांनी बांगर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. मिसाळ यांची थांबवलेली बदली झाल्यामुळे महापालिका वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यात अपयश आल्यामुळे अण्णासाहेब मिसाळ यांची
काही दिवसांपूर्वीच नगरविकास खात्याने तडका-फडकी बदली केली होती. अचानक झालेल्या बादलीमुळे सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला होता.

मिसाळ यांच्या जागेवर नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती केली होती. मिसाळ हे फक्त आयुक्त नसून निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून केली असल्याने त्यांची अचानक झालेली बदली सरकारला थांबवावी लागली.

त्यामुळे बांगर रुजू होण्यापूर्वीच मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. त्यामुळे मिसाळ यांनी पुन्हा शहरात कामाला श्रीगणेशा करून कोरोना रोखण्याकरिता विविध योजना आखल्या. स्वतः रस्त्यावर उतरून शहरात विविध ठिकाणच्या हॉट-स्पॉटला भेटी देत अधिकाऱ्यांचे कौतुक केले. एकीकडे मिसाळ यांचे शहरात कामे सुरू असली तरी बांगर यांची नवी मुंबई महापालिकेत येण्याची तयारी थांबलेली नव्हती. बांगर यांची प्रशासनाने बदली करून त्यांना नागपूर मधून कार्यमुक्त केल्याने ते नवी मुंबईचा पदभार स्वीकारण्यास इच्छुक होते.
तर दुसरीकडे मिसाळ यांना स्थगिती मिळाल्याने बांगर यांच्यासमोर प्रतीक्षा करण्यापलीकडे पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत कोरोनाचे वाढते रुग्ण थांबवण्याचे आव्हान मिसाळ यांना देण्यात आले होते. दर दोन दिवसाआड सीएमओ कार्यालयातून कोरोनाची माहिती जाणून घेतली जात होती. त्यामुळे कोरोनाचा दबाव मिसाळ यांच्यावर वाढतच चालला होता.

अशा परिस्थितीत मिसाळ यांनीच आपल्याला कार्यमुक्त करण्याची विनंती सरकारला केल्याची सूत्रांकडून समजते. मिसाळ यांना मुक्त करताच आज सकाळी बांगर यांनी महापालिकेच्या कामाचा पदभार स्वीकारला. परंतु बांगर यांनी अचानक भेट देऊन पालिकेची सूत्रे स्वीकारल्यामूळे सर्वच अचंभीत झाले आहेत.