काळा पैसा: स्विस बँकेने भारताला दिली दुसरी यादी
नवी दिल्ली: काळा पैसा प्रकरणी भारताला मोठे यश मिळाले. स्विस बँकेने त्यांच्या भारतीय खातेदारांची दुसरी यादी केंद्र सरकारला दिली. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात असलेल्या करारानुसार स्विस बँकेने त्यांच्याकडे असलेल्या भारतीय खातेदारांची माहिती सरकारला दिली. पहिली यादी २०१९ मध्ये आणि दुसरी यादी या वर्षी मिळाली. स्विस बँकेने खातेदाराचे त्यांच्याकडे नोंदवलेले नाव, ओळखपत्राचे पुरावे, खाते क्रमांक तसेच संबंधित खात्यात विशिष्ट कालावधीत असलेल्या संपत्तीबाबतची माहिती सरकारला दिली आहे.

स्वित्झर्लंडमध्ये सुटसुटीत करव्यवस्था आहे. या व्यवस्थेचा गैरफायदा घेत जगातील अनेक देशांमधले श्रीमंत त्यांची बेहिशेबी संपत्ती बँक खाती आणि लॉकरमधून स्विस बँकेत दडवून ठेवतात. या संपत्तीची माहिती जगापासून लपवून ठेवण्यासाठी स्विस बँक संबंधित खातेदारांकडून विशेष फी वसूल करत होती. मात्र काळ्या पैशाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावगट तयार झाल्यानंतर स्वित्झर्लंडने भारतासह जगातील ८६ देशांशी करार केला. या करारानुसार स्विस बँक संबंधित देशांना टप्प्याटप्प्याने खातेदारांची माहिती देत आहे.

स्विस बँकेने सुमारे ३१ लाख खातेधारकांची माहिती २०१९ मध्ये जगाला दिली. या वर्षी आणखी ३१ लाख खातेधारकांची माहिती स्विस बँकेने जगाला दिली. खातेदार ज्या देशाचा नागरिक आहे त्या देशाला माहिती द्यायची या पद्धतीने ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली. माहिती प्रसिद्ध झाली तरी ठोस पुरावे असल्याशिवाय स्विस बँकेतील संबंधित खातेदाराची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार सरकारकडे नसेल. लागोपाठच्या दोन वर्षांमध्ये ज्या खातेदारांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली त्यात मोठ्या संख्येने भारतीय आहेत. भारतीय खातेधारकांमध्ये व्यक्ती तसेच काही संस्था आणि खासगी कंपन्यांचाही समावेश आहे.

स्विस बँकेकडून मिळालेल्या माहितीआधारे तपास करुन केंद्रीय तपास यंत्रणांना खातेधारकाच्या बेहिशेबी संपत्ती विषयी ठोस पुरावे गोळा करावे लागतील. या पुराव्यांच्याआधारे स्विस बँकेतील तसेच भारतातील संपत्ती जप्त करण्याची कारवाई करता येऊ शकेल. ज्या भारतीयांची खाती स्विस बँकेत आहेत ते प्रामुख्याने कर चुकवेगिरी करणारे तसेच आर्थिक घोटाळे करणारे आहेत.
आतापर्यंत स्विस बँकेने ज्या खात्यांची माहिती जगाला दिली त्यात प्रामुख्याने काही वर्षांपूर्वी बंद झालेल्या बँक खात्यांची माहिती आहे. या खात्यांमधील संपत्ती नव्याने कुठे वेगळ्या नावाने गुंतवण्यात आली आहे अथवा अन्यत्र दडवण्यात आली आहे याची माहिती अद्याप हाती आलेली नाही. संबंधित देशांच्या तपास यंत्रणांनी या माहितीआधारे तपास करावा आणि पुराव्यांआधारे पुढील कारवाई करावी, अशी भूमिका स्विस बँकेने घेतली आहे.
