भाजपची कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे केंद्रात, खडसे-तावडे फक्त विशेष निमंत्रित; वाचा सविस्तर कुणाला संधी कुणाला डावलले
मुंबई 3 जुलै: भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती.

नाजार असलेल्या पंकजा मुंडें यांना पक्षाच्या पातळीवर केंद्रात मोठी जबाबदारी दिली जाणार आहे असं पाटील यांनी सांगितलं. तर एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना फक्त विशेष निमंत्रित म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
“पंकजाताईंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळेल, कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी भूमिका त्यांची असेल”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी, पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असं नाही, असंही स्पष्टीकरण दादांनी दिलं.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “कोरोना संकटामुळे भाजपची कार्यकारणी घोषित करायची राहिली होती. कोणतीही घोषणा सगळ्यांशी बोलून, सगळ्यांना बरोबर घेऊन करायची असते. त्यामुळे थोडा वेळ लागला. माझ्याबरोबर 12 प्रदेश उपाध्यक्ष आहेत. 5 सेक्रेटरी म्हणजेच सरचिटणीस आहेत.

या प्रमुख कार्यकारणीत माझ्यासोबत 12 प्रदेश उपाध्यक्ष, 12 सेक्रेटरी, 6 जनरल सेक्रेटरी आणि 1 कोषाध्यक्ष आहेत. याशिवाय 7 प्रमुख मोर्चे असतात. त्याचे अध्यक्षही आम्ही घोषित करतो. या व्यतिरिक्त 18 प्रकोष्ठ म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे प्रमुख घोषित करत आहोत. प्रदेशाचे कार्यालय, मीडिया, सोशल मीडिया या सर्वांचे प्रमुख आम्ही घोषित करत आहोत”.
हे आहेत नवे प्रदेश उपाध्यक्ष
राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, माजी आमदार सुरेश हळवणकर, खासदार प्रीतम मुंडे, आमदार प्रसाद लाड, चित्रा वाघ, माधवी नाईक, खासदार कपिल पाटील, खासदार भारती पवार, जयप्रकाश ठाकुर
६ नवीन महामंत्री –
सुजित सिंह ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय, विजय पुराणिक