भाजप आमदाराची गांधीगिरी:बँक मॅनेजर शेतकर्यांना देत नव्हते कर्ज, मॅनेजरचे पाय धुवून वाहिली फुले वाहिली
स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक गरीब शेतकर्यांना कर्ज देत नसल्याचा सुरेश धस यांचा आरोप
शेतकर्यांच्या आरोपावर बँक व्यवस्थापकाने दिले असे स्पष्टीकरण
बीड: शेतकऱ्यांच्या पीक विम्याचं कर्ज बँकेकडून मंजूर केलं जात नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यामुळे हे कर्ज तात्काळ मंजूर व्हावं म्हणून भाजपचे आमदार सुरेश धस यांनी चक्क बँक मॅनेजरचे पाय धुतले आणि या बँक मॅनेजरवर फुलेही उधळली. त्याच्या पायाही पडले. धस यांच्या या अनोख्या गांधीगिरी आंदोलनामुळे आता तरी बँकेकडून पीक कर्जांना मंजुरी मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे

यायाबतचा बीडमधून भाजप नेते सुरेश धस यांचा एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये ते एका बँकेच्या व्यवस्थापकाला कर्ज देण्यासाठि विनंती करत त्यांचे पाय धुताना दिसत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाचा हा व्यवस्थापक गरीब शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याचा आरोप धस यांनी केला आहे. यामुळे गांधीगिरी अवलंबत त्यांनी व्यवस्थापकाचे पाय धुतले आणि फुले वाहिली.

सुरेश धस म्हणाले की हा बँक व्यवस्थापक ‘धना’चा देवता आहे. त्यांची कृपा होण्यासाठी मी त्यांचे पाय पाण्याने धुऊन त्यांच्यावर फुले वाहिली. आता ही कल्पना कितपत प्रभावी ठरेल ते पहावे लागेल. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फायली लवकरात लवकर पास कराव्यात जेणेकरून त्यांना वेळेत पैसे मिळावेत आणि शेतीची कामे त्यांना करता येतील. जर त्यांनी असे केले नाही तर ते आणि त्याचे समर्थक दररोज येतील आणि त्यांना फुले वाहतील.

सुरेश धस यांनी पीक कर्जाबाबतचं भयाण आणि धक्कादायक वास्तव मांडलं आहे. पीकं बाजारात जाण्याची वेळ आली तरी बळीराजाला पीक कर्ज अद्याप मिळालेलं नाही. बँकांच्या मनमानी कारभारामुळे आणि सरकारच्या अनास्थेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. आष्टी तालुक्यातील आष्टा हरिनारायण गावात देखील पीककर्ज वाटपाचा पुरता फज्जा उडालेला आहे. येथील भारतीय स्टेट बँक शाखेच्या व्यवस्थापकांना वारंवार भेटून विनंती करून देखील पीककर्ज वाटप यंत्रणेत काहीच बदल होत नव्हता. बँकेच्या शाखेमध्ये बारा गावातील शेतकऱ्यांची सतराशे पीक कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शेतकरी खेटे मारून दमले पण मंजुरी मिळत नव्हती.
शेतकऱ्यांच्या आरोपांवर बँक व्यवस्थापकाने दिले स्पष्टीकरण
शेतकऱ्यांचा आरोप आहे की त्यांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जास उशीर होत आहे, परंतु 1500 शेतकर्यांकडून आपल्याकडे अर्ज आल्याचे बँक व्यवस्थापकाचे म्हणणे आहे. सद्यःस्थितीत 400 शेतकर्यांच्या फाईल्स तपासणीनंतर पास केल्या आहेत. तर उर्वरित शेतकर्यांनाही लवकरच दिले जाईल, असे बँक व्यवस्थापकाने म्हटले आहे.