डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विट ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’…जगाची उत्सुकता वाढली
वॉशिंग्टन, १५ जुलै : सध्या संपूर्ण जग करोना व्हायरसमुळे त्रस्त असून सगळयांचे लक्ष करोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना लसी संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण टि्वट केले आहे. ‘ग्रेट न्यूज ऑन व्हॅक्सीन्स’ असे त्यांनी या टि्वटमध्ये म्हटले आहे.


करोना लसी संदर्भात चांगली बातमी असा त्या टि्वटचा अर्थ आहे. डोनाल्ड ट्रम्प लसी संदर्भात मोठी घोषणा करु शकतात असा कयास बांधला जात आहे. अमेरिकेत वेगवेगळया कंपन्या करोनावर लस विकसित करत असून यात आघाडीवर असलेल्या मॉडर्ना कंपनीची लस पहिल्या फेजमध्ये यशस्वी ठरली आहे.
दुसरीकडे, कोरोनावरील लसीबाबत उद्या, गुरुवारी महत्वाची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे आयटीव्हीचे राजकीय पत्रकार रॉबर्ट पेस्टॉन यांनी सुत्रांच्या हवाल्याने सांगितले. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या मदतीने अॅस्ट्रा झिनेका या कंपनीने COVID-19 वरील लस तयार केली आहे. महत्वाचे म्हणजे या लसीची तिसरी आणि शेवटची मानवी चाचणी सुरु आहे.
अॅस्ट्रा झिनेका (AstraZeneca) या कंपनीने या व्हॅक्सिनचे लायसन्स मिळविले आहे. ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींवर प्रभावी ठरली आहे. परंतू अद्याप पहिल्या मानवी चाचणीचे अहवाल यायचे आहेत. ही लस बनविणाऱ्या संशोधकांनी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सांगितले की, या लसीच्या चाचणीवेळी रुग्णांच्या वाढलेल्या प्रतिकार शक्तीने आम्हाला आश्चर्यचकित केले आहे.