सोलापूर : शहरात कोरोना विषाणूची व्याप्ती वाढत चालली आहे. तेलंगी पाच्छा पेठ, रविवार पेठेत कोरोनाचे रुग्ण आढळून आले. आता ७० फूट रोड परिसरातील एका ६९ वर्षीय महिलेचा रविवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या १५ झाली आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वी ग्रीन झोनमध्ये असलेल्या सोलापूरचा आता रेड झोनमध्ये प्रवेश करीत आहे.

७० फूट रोड परिसरातील भारतरत्न इंदिरा गांधी नगर येथील रहिवाशी असलेल्या या महिलेला सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. सकाळी उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले. ही महिला एका प्राध्यापकाची माता असल्याचे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात आले.
इंदिरा नगर परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे. महापालिकेच्या वतीने घरोघरी सर्वेक्षण करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचे ७१८ संशयित रुग्ण आहेत. यापैकी ५०५ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. १५ जणांचे रिपोर्ट पॉझीटिव्ह आले आहे. दोन जणांचा मृत्यू झाला आहे.


इंदिरानगर परिसरात ही महिला राहत होती. येथील संपूर्ण एरिया सील करण्यात आला आहे. हा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. येथे नागरिकांना प्रवेश करण्यास आणि बाहेर पडण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
या भागात महापालिकेच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यास वेगात सुरुवात करण्यात आली आहे .या महिलेच्या संपर्कात असलेल्या आठ व्यक्तींची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे .या आठ व्यक्तींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे .संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याची प्रक्रिया सुरुवात करण्यात आली. आहे सोलापुरात आत्तापर्यंत एकूण 15 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली उर्वरित 13 व्यक्तींचा सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहे.