बार्शीच्या मार्केट कमिटीत आज 18 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन
बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येत्या मंगळवारी दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता 18 कोटी 45 लाख रुपयांच्या विविध विकास कामाचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर राऊत यांनी दिली.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.यावेळी आमदार राजेंद्र राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे उपसभापती झुंबर जाधव,सचिव तुकाराम जगदाळे आदी उपस्थित होते.
आमदार राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार ओमराजे निंबाळकर आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, पंचायत समिती सभापती अनिल डिसले, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील,जिल्हा उप निबंधक कुंदन भोळे, संतोष निंबाळकर,कपिल कोरके आदी मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम होणार आहे.

यावेळी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने 50 लाख रूपये खर्चुन उभारण्यात आलेल्या 96 किलो वॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे व कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालयासभोवतीचे परमपूज्य श्री महावीर स्वामी भगवान व्यापारी संकुल व भगवान श्री 1008 आदिनाथ तीर्थंनकर व्यापारी संकुलाचे लोकार्पण होणार आहे.
यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माॅ साहेब बाजार समिती आवार लातूर रोड बार्शी येथे 3 कोटी 90 लाख रूपये खर्चून बांधण्यात येणा-या जगद ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व्यापारी संकुल व शेतकरी निवास भूमिपूजन होईल. 3 कोटी 45 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या कै. दिगंबर वासुदेव नारकर शीतगृह बांधकामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.
तीन कोटी दहा लाख रुपये खर्चून लातूर रोडवर जनावर बाजार निवारा शेड बांधकाम भूमिपूजन, एक कोटी पाच लाख खर्चून कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी चे मुख्य बाजार आवार गेट नंबर 3 शेजारी व्यापारी संकुल भूमिपूजन, दहा लाख खर्चुन कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी मुख्य बाजार आवार येथे सीसीटीव्ही कॅमेरे, तीन कोटी 50 लाख रुपये खर्चून बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आवार वैराग येथे एक हजार मेट्रिक टन क्षमतेचे शीतगृह बांधकाम, एक कोटी 35 लाख रुपये खर्चून कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी चे दुय्यम आवार वैराग येथे जनावर बाजारासाठी निवारा शेड बांधकाम आधी विकास कामाचे भूमिपूजन होणार आहे.