सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार बी पी सुलाखे कॉलेज बार्शीच्या डॉ.एस. के. पाटील यांना
बार्शी –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानाचा समजला जाणार्या उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कारासाठी बार्शीतील बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकरराव किसनराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

याशिवाय, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी डॉ. माया पाटील, सामाजिकशास्त्रे संकुल, विद्यापीठ कॅम्पस व उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कारासाठी श्री गिरीश कुलकर्णी, विद्यापीठ अभियंता यांची निवड करण्यात आली आहे. तर यंदाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार कोर्टीच्या एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला प्राप्त झाला आहे.
सोमवारी (दि.१) विद्यापीठाचा १८ वा वर्धापन दिन समारंभ साजरा होणार आहे. सकाळी नऊ वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सकाळी अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे. या समारंभास शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठाच्या वर्धापनदिनी विविध पुरस्कार दिले जातात. त्यासाठी दरवर्षी संबंधितांकडून प्रस्ताव मागवून घेऊन निवड समितीद्वारे निवड केली जाते. एक ऑगस्ट रोजी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाते. वर्धापन दिनाच्या या सोहळ्याला विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
डॉ. शंकरराव पाटील यांनी आपले प्राथमिक शिक्षण जि.प.प्रा.शाळा, खांडवी येथे तर माध्यमिक शिक्षण सिल्व्हर ज्युबिली प्रशाला, बार्शी या ठिकाणी घेतले. त्यांनी पदवीचे शिक्षण बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथून व पदव्युत्तर पदवी आण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर (पुणे) येथून पूर्ण केले. डॉ. शंकरराव पाटील यांनी वाणिज्य व व्यवस्थापन या विषयात एम. फिल. ही उच्च पदवी प्राप्त केली तर स्कुल ऑफ कॉमर्स ऍन्ड मॅनेजमेंट, स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथुन प्रा. डॉ. आर. डी. बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. ही संशोधनामधील सर्वोच्च पदवी प्राप्त केली.
डॉ. शंकरराव पाटील हे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी.पी. सुलाखे कॉमर्स कॉलजे, बार्शी येथे दि. ०१ जानेवारी १९८७ रोजी प्राध्यापक या पदावर रुजू झाले. त्यांनी सलग २९ वर्ष प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य केले आणि १० ऑक्टोबर २०१६ पासून त्याच महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.
हा पुरस्कारासाठी त्यांच्या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी.टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार, खजिनदार बापुसाहेब शितोळे यांचेसह सर्व कार्यकारिणी सदस्य, विद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.