बार्शीचे पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली, रामदास शेळके नवे पोलीस निरीक्षक
बार्शी – बार्शी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांचा बार्शीतील कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदली झाली आहे. सोलापूर नियंत्रण कक्ष येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली. तर बार्शी शहर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक म्हणून रामदास शेळके यांना नियुक्ती देण्यात आली आहे. सोलापूर ग्रामीण च्या जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी हे बदलीचे आदेश काढले आहेत.

गिरीगोसावी हे ऑक्टोबर 2019 रोजी तात्पुरत्या नियुक्ती वर बार्शी शहर पोलीस स्टेशनला आले होते. त्यांनी संवेदनशील असलेल्या बार्शीतील विधानसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. या शिवाय त्यांनी कोरोना काळात ही जबाबदारी घेऊन काम केले होते.

अतिशय कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यांच्या काळात त्यांनी खोट्या गुन्ह्याला आळा घातला. बार्शीत बंदोबस्ताला येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सर्व सोयीयुक्त विश्रामकक्ष त्यांनी पोलीस ठाण्यात तयार केला. पोलिसांना पेट्रोलिंग साठी आठ दुचाकी गाड्या पोलीस स्टेशनच्या ताफ्यात आणल्या.

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी लोकसभागातून जिम आणि लहान मुलांसाठी खेळणी बसवली.त्यांच्या कार्यकाळात बार्शीत एकही खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही.पूर्वी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन बाहेरून बंदोबस्तासाठी फौजफाटा येत असत मात्र गिरीगोसावी यांनी तशी वेळ येऊ दिली नाही. त्यांचा कोरोना योद्धा म्हणून बार्शीत अनेक संघटनांनी गौरव केला. युगदर्शक आयकॉन म्हणून ही सत्कार झाला आहे.एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची पोलीस खात्यात ओळख आहे.
शहर पोलीस स्टेशनचे पीएसआय प्रेमकुमार केदार यांची पंढरपूर ग्रामीण व अमोल ननवरे यांची पांगरी पोलीस स्टेशनला बदली करण्यात आली आहे. बार्शीला नियुक्ती झालेले रामदास शेळके यांनी यापूर्वी जत आणि जेजुरी पोलीस स्टेशन येथे प्रभारी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे.