बार्शी : घरासमोर लावलेली मोटरसायकल भरदिवसा चोरट्याने डोळ्यादेखत पळविल्याची घटना बार्शीतील शिवाजीनगर भागात घडली.
याबाबतची माहिती अशी की, तुळजीराम विठ्ठल जगदाळे (वय ३६), रा. पाटील प्लॉट, शिवाजीनगर हे दि. ६ एप्रिल २०२२ रोजी दुपारी साडेबाराचे सुमारास कामावरुन घरी जेवण करण्यासाठी आले. नेहमीप्रमाणे ते त्यांची मोटरसायकल हिरो प्रो एमएच-१३-सीई-९९३४ ही घराबाहेर लावून जेवण करण्यासाठी घरात गेले.
काही वेळातच मोटरसायकल सुरु केलेला आवाज ऐकू आल्यामुळे घराबाहेर येऊन पाहिले असता, एक अनोळखी इसम त्यांची मोटरसायकल चालू करुन घेऊन जात असलेला दिसला. त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो भरधाव वेगाने निघून गेला.

तुळजीराम जगदाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
यापूर्वी बार्शी शहरांतून १ फेब्रुवारीला मंगळवार पेठेतून बागवान, १० फेब्रुवारीला तेलगिरणी चौकातून होनाळे, २ मार्चला उपळाई रोडवरुन रामगुडे, १२ मार्चला देशपांडे वाडा येथून आंबेकर यांच्या मोटरसायकल चोरीस गेलेल्या आहेत.