B.A. पास इंजिनिअर ; वाचा धडपड्या तरुणाची कहाणी

0
175

B.A. पास इंजिनिअर ; वाचा धडपड्या तरुणाची कहाणी

ही गोष्ट आहे बार्शी (जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मिथुनची. आजच्या पिढीतील युवकांमध्ये उच्च शिक्षित होऊन ही जॉब नाही, चांगला पगार नाही, व्यावसाय करायचा तर कोणता करू, केलाच तर यश-अपयशाची चिंता आणि या कारणाने नैराश्य येते त्यातून व्यसनाधीनता वाढते आणि काही मूर्ख लोक तर थेट आत्महत्ये सारखा गंभीर पाऊल उचलतात. म्हणूनच आपल्या दृष्टीने आजच्या स्पर्धेच्या, धकाधकीच्या, अवघड, काहीच खरे नाही अशा काळात बार्शीच्या मिथुनची गोष्ट प्रत्येकाने वाचली पाहिजे.

मिथुनची गोष्ट लिहतोय म्हणजे ती फार रंजक, मीठ मसाला लावून लिहतोय असे मुळीच नाही. त्याच्या आयुष्यात मागील काही काळात घडलेल्या गोष्टी अनुभव या ठिकाणी मांडतोय. माझी आणि मिथुनची ओळख झाली ती 2007 मध्ये तो बार्शीतील श्री शिवाजी महाविद्यालयातुन तर मी बी पी सुलाखे कॉमर्स कॉलेज मधून NCC करत असताना. सुरवातीला आम्ही मैदानावर आठवड्यातून एकदा – दोनदा भेटत. पुढे आम्ही हळू हळू चांगले मित्र झालो.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

मिथुन पहिल्या पासून एकदम कलाकार माणूस, कोणतीही नवीन गोष्ट शिकायची आत्मसाद करायची हा त्याचा स्वभाव होता. वर्षभर केवळ इतर गोष्टीत वेळ घालवला तरी परिक्षे आगोदर दोन महिने रात्री उशिरा पर्यंत चिकाटीने अभ्यास करायचाच. त्याच्या बरोबर आम्हाला ही श्री शिवाजी महाविद्यालयाच्या स्टडी रूम रात्री उशिरा पर्यंत बसायला लावायचा.

मिथुनचे आज्जी-आजोबा बार्शी भाजी मंडई मध्ये भाजीपाला विक्रीचा व्यावसाय करत होते. तो रोज सकाळी त्यांना मदत करण्यासाठी तसेच प्रत्येक शनिवारी दिवसभर भाजी मंडईत आज्जी-आजोबांना मदत करत असे. मिथुन ने सर्पमित्र म्हणून प्रशिक्षण घेतलेले. त्याने मलाही विषारी-बिनविषारी सापांची माहिती देऊन सर्पमित्र बनवलेले. तर कॉलेज मध्ये NCC, NSS यासह इतर कार्यक्रमात त्याचा सहभाग नेहमी असायचाच. कॉलेज मध्ये होणारे विविध मान्यवरांचे व्याख्याने ऐकणे हा तर त्याचा छंदच होता.

कॉलेज जीवनातच आम्ही सर्व पुरोगामी विचारांकडे झुकलेलो त्यातूनच अनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती) मध्ये काम केले. त्यामुळे जेष्ठ व वैचारिक लोकांसोबत चांगला परिचय होता. सर्पमित्र म्हणून बार्शी शहरात त्याची ओळख होती. कॉलेज जीवनातच सर्वत्र प्रसिद्ध असे हे व्यक्तिमत्त्व होते. तरीही तो कधी कोणते काम करताना लाजत नव्हता. त्याच्यासाठी कोणते ही काम लहान किंवा मोठे नव्हते. भाजी मंडई मध्ये बिनदास्त आज्जी आजोबा बरोबर भाजी विक्री करायला बसायचा. कॉलेज मधील मित्र-मैत्रिणी, प्राध्यापक किंवा इतर कोण ओळखीचे आले तरी कधी तो लाजला नाही. तो मात्र कांदे घ्या…बटाटे घ्या… या आरोळीत मग्न असायचा. या कामातूनच त्याची चांगली व्यवसायिक वृत्ती वाढत गेली.

मार्केट यार्ड मधून भाजीपाला घेऊन येण्यासाठी रिक्षाला खुप पैसे जातात त्याचा हिशोब करून पट्याने तीनचाकी अँपे रिक्षाच विकत घेतली. मग काय स्वतःच्या भाजीपाला बरोबर सकाळी सकाळी इतर भाजी विक्रेत्यांची ही फेरी तो करत असे. तोच अँपे रिक्षा घेऊन रात्री आम्हा सगळ्या मित्रांना घेऊन गावात चक्कर सुरू असायच्या. त्यातच सेकंड हँन्ड इंडिका गाडी घेण्याचा त्याचा विचार सुरु होता. गाडीचा सौदा आजून होतोय एक चक्कर मारून येतो म्हणून हा गेला आणि कुठल्यातरी गावाला जाऊन दोन हजार रुपयांचे भाडे मारून आला. पुढे गाडी घेतली गाडीचा ही व्यावसाय केला. त्याच गाडीवर आम्हा मित्रांना त्यानेच चारचाकी गाडी चालवायला शिकवली. कोणती ही गोष्ट करताना त्याकडे व्यावसाईक दृष्टीने पाहण्याची त्याची सवय होती. पण त्याला आयुष्यात नेमके काय करायचे आहे हे कोणालाच कळत नव्हते. मला ही वाटते की त्याने अमुक एक ध्येय ठरवले असेलच असे नाही. त्याला विचारले तर चांगला माणूस म्हणून जगणे हेच आपले ध्येय असे त्याचे उत्तर येई.

6-7 वर्षांपूर्वी मिथुनने अचानक बार्शी सोडली आणि पुणे गाठले. हातात फक्त B.A. ची डिग्री आणि एक बॅग येवड्यावर पुण्यात निभाव लागणे शक्य वाटत नव्हते. तरी पुणे गाठले अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. मिथुनचे इंग्रजी खूप उत्तम होते. तो अगदी सफाईदारपणे इंग्रजी भाषेत संभाषण करत असे. याच कौशल्यावर इन्फोसेस मध्ये बॅक ऑफिस ला त्याला महिनाकाठी 10-12 हजाराची नौकरी मिळाली. रूम भाडे, मेस, प्रवास त्यातच त्याची लेवल लागत होती. मिथुन पुण्याला आहे म्हंटल्यावर आम्ही पुण्याला गेलो की आवर्जून त्याच्याकडेच जात होतो. तो त्याच्या जॉब वर समाधानी होता पण आहे त्या पोस्ट वर परवडत नव्हते. ज्या इन्फोसेस कंपनीत इंजिनीअर काही लाख रुपयात सुरवात करतो तिथी आपली पगार म्हणजे त्यालोकांचा एक दिवसाचा खर्च आहे, या कंपनीत त्या लोकांच्या सोबत काम करताना चहा नास्ता केला तरी महिनाकाठी 20-25 हजार खर्च होतात या आणि अशा अनेक गोष्टीवर इन्फोसेस च्या बाहेर असलेल्या बस स्टॉप वर तासंतास आम्ही गप्पा मारत बसायचो. त्याची स्थिती पाहून मी अस्वस्थ होत असे पण तो नेहमी सकारात्मक होता.

स्वस्थ, निवांत अन समाधानी बसेल तो मिथुन कसला. बॅक ऑफिस ला बसून तो इतर इंजिनियर लोकांना मदत करत असे. ते कोणते काम करतात त्याचे स्वरूप काय, कोणता प्रोजेक्ट आहे याची सर्व माहिती त्याला असायची. यातूनच त्याने पुण्यात कॉम्प्युटर लॅंग्वेज चे क्लास लावले ते चिकाटीने पूर्ण केले. पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट कधी नाईट शिफ्ट कधी सहकार्याला ऍडजस्ट करणे त्याचीही शिफ्ट स्वतः करणे असे सर्व करताना जॉब पिंपरी-चिंचवड इन्फोसेस -३ ला क्लास पुणे शहरात तर रूम तिसरी कडेच म्हणजे अनेकदा 24-24 तास न झोपता न थकता त्याने काम, प्रवास आणि क्लास केले होते. त्यातच माझे पुण्याला जाणे झाले तरी मित्र येतोय म्हंटले की हा पुणे स्टेशनवर न्यायला हजर असायचा.

क्लास पूर्ण झाला की त्याने पुण्यात पार्ले ची एजन्सी चालवायला घेतली. पुणे शहरातील कॉलेज व कॅम्पस कॅन्टीन असे मर्यादित countar व्यवसाय करायचा ही पार्ले कंपनी ची अट होती तरी आहे हा जॉब करून त्याने पुण्यात चांगला जम बसवला. छोट्या भावाला पिकअप घेऊन दिला व डिलिव्हरी त्याच्याकडे तर हा स्वतः ऑर्डर घेत होता. सर्व व्यवस्थित सुरू असताना कोल्हापूर येथे मोठा पूर आला अनेक गाव पुराने वेढलेली, सरकारी पातळीवर मोठे प्रयत्न होत होते पण लहान मुलांचे हाल होत आहेत बिस्कीट, पॅकेट बंद फूड आणि औषधांचा तुटवडा आहे ही बातमी वाचली आणि तो व्यथित झाला. एक दोन सामाजिक संस्थाना त्याने कॉल केला क्षणाचाही विचार न करता सर्व माल गाडीमध्ये भरला आणि थेट कोल्हापूर मध्ये जाऊन वाटून टाकला.

त्याचा फोटो पाहून मी कॉल केला तू काय करतोय याची कल्पना आहे का तुला कोणी ponsar भेटला का मी गंभीर होऊन विचारात असतानाच त्याने शांत हसत उत्तर दिले आजपासून एजन्सी बंद माल आणि भांडवल दोनी संपले. लोकांचा विचार करताना एका क्षणात सर्व कमावलेले गरजवंतांना देऊन तो मोकळा झाला. मी त्याला भेटायला पुण्यात गेलो पुण्यात असलेला भाड्याच्या फ्लॅट त्याने खाली केलेला पिंपरी चिंचवड च्या पुढे गावाच्या बाहेर त्याने रूम केली होती. त्याची आर्थिक स्थिती पुन्हा खालावलेली म्हणून भाडे कमी आसलेल्या भागात त्याने रूम केलेली. त्याला विचारले वरील गोष्टीची गरज नव्हती का केले असे. पण त्याच्या स्वभावा प्रमाणे तो मात्र शांत रहात म्हणाला पुन्हा नव्याने सुरू करू.

तोच मिथुन जो भाजी विकतो, जो अँपे चालवतो, तो ड्रीव्हिंग करतो, तो पुण्यासारख्या शहरात एजन्सी चालवतो, तो बॅक ऑफिस ला काम करतो असा ग्रामीण भागातील साधा B.A. पास मिथुन आज चिकाटीने, मेहनतीने इन्फोसेस कंपनीत जॉब करत त्याचे आज Infosys IT Development मध्ये Technology Analyst म्हणुन Promotion झाले. जे पद मिळवण्याचे स्वप्न फक्त B.E. पास झालेले पाहतात ते स्वप्न बार्शीतील B.A. पास मिथुन ने पूर्ण केले आहे.

आच चक्क एक B.A. पास झालेला ग्रामीण भागातील युवक मोठ्या कंपनी मध्ये आयटी इंजिनिअर झाला आहे. त्याने मिळवलेले यश मोठे आहे किंवा नाही हे जरा बाजूला ठेवा पण त्याने केलेला आज पर्यंतचा प्रवास निश्चितच कौतुकास्पद आहे. जॉब नाही नोकरी नाही म्हणून हताश न होता प्रत्येक ठिकाणी त्याने स्वतःसाठी संधी शोधली हे फार कौतुकास्पद आहे.

(खूप खूप शुभेच्छा मित्रा… तुझ्या बद्दल लिहील तेवढे कमी आहे. तुझ्या अश्याच वागण्यातून, बोलण्यातून, विचारातून तू मार्गदर्शन करत रहा हीच अपेक्षा.)

सुदर्शन हांडे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here