दिनांक: २६ ऑगस्ट; शुक्रवार
श्रावणमास प्रवचनमाला
प्रवक्ते: गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले.
विषय : संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान
श्रीभगवंत मंदिर, बार्शी.
तुकाराम महाराजांना अव्दैताचा साक्षात्कार झाल्याने आता त्यांच्यामध्ये कोणतेही द्वंद्व शिल्लक राहिले नाही- जयवंत बोधले महाराज
बार्शी:संत तुकाराम महाराजांना अव्दैताचा साक्षात्कार झाल्याने आता त्यांच्यामध्ये कोणताही द्वंद्व शिल्लक राहिला नाही. त्यांना ब्रह्मतत्वाची अवस्था प्राप्त झाली आहे. असे गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन प्रवचनमालेच्या उत्तरार्धाच्या दिशेने वाटचाल करताना २९ व्या दिवशी निरुपण करतात.

संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगातील चरणाने रामेश्वर भट्टांचा दाह नाहीसा करतात. हा सामर्थ्यशाली सत्पुरुष आहे तरी कोण? असा प्रश्न अनगरशहा फकीराला पडतो. हा तुकाराम नावाचा महात्मा मला आत्तापर्यंत का भेटला नाही? ज्ञानेश्वर माऊलींनी रामेश्वर भट्टांना सांगावे तू तुकाराम महाराजांना शरण जा! म्हणून, अनगरशहा फकीर तुकाराम महाराजांना भेटायला निघतात. साक्षात भगवान पांडुरंग संत तुकाराम महाराजांना भेटावे, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराजांसारखे संतही तुकाराम महाराजांना भेटतात, म्हणजे संत तुकाराम महाराजांचा अधिकार किती मोठा होता. हेच यावरुन सिद्ध होते, असेही महाराज सांगतात.
पुढे अनगरशहा फकीर संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी जातात. आणि तुकाराम महाराजांच्या घराजवळ येऊन थांबतात. जिजाई बाहेर डोकावून पाहतात. व गंगूला (मूळ नाव- भागिरथी,जिजाईची मुलगी) म्हणतात, अगं बाहेर कोणीतरी याचक आलेला आहे. त्याला चिमूटभर पीठ दे. गंगू चिमूटभर पीठ घेवून त्या फकीराच्या झोळीत टाकते. आणि काय आश्चर्य….. ती झोळी चिमूटभर पीठ टाकताच भरुन वर आली.
फकीर गंगूकडे आश्चर्याने पाही लागले. गंगूला म्हणाले, का…. गं….! तूच तुकोबा आहेस का!! गंगू म्हणाली , मी त्यांची मुलगी आहे. फकीर बाबांच्या मनात वाटले तुकोबांच्या मुलीकडून चिमूटभर पीठाने ही माझी झोळी भरुन वर येत असेल तर प्रत्यक्ष तुकोबांना भेटल्यावर काय होईल? फकीर बाबांच्या मनामध्ये तुकोबांच्या भेटीची आतूरता पुन्हा जास्त वाढली. त्यांनी गंगूला विचारले, मग तुकोबा कुठे आहेत? गंगूनी सांगितले, ते मंदिरात गेलेत कीर्तनाला!

फकीर बाबा मंदिरात जातात. मंदिरात संत तुकाराम महाराजांचे कीर्तन चालू असते. कीर्तन ऐकण्यासाठी बसतात.
तुकाराम महाराजांचा अभंग, तरुवरा बीजा पोटी। वृक्षाचे मूळ ‘बीज’ आहे. यासाठी उदाहरण मडक्याचे देतात. घट-पट या संबंधाने अनेक तात्विक चिंतन गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज समजावून सांगतात. मडकं आणि कपडा या २ वस्तू म्हणजे घट-पट होय.
या संबंधात महाराजांनी २ कारणे सांगितली आहेत.
१) उपादान कारण
२) निमित्त कारण
ज्याच्याशिवाय कर्म घडत नाही, ते उपादान कारण होय. आणि निमित्त कारण सांगताना, प्रथमतः कुंभार, चक्र, माती आणण्यासाठी लागणारे गाढव हे निमित्त कारण म्हणा. तुकाराम महाराज म्हणतात-
तुम्हा आम्हा तैसे झाले।
बीजाला कारण काय, वृक्ष! तर वृक्षाला कारण बीज. म्हणजेच, तुम्ही आणि आम्ही एकच आहोत, असे संत तुकाराम महाराज सांगतात.