बार्शी शहर व तालुका भाजपचे आघाडी सरकारच्या विरोधात थेट शेतकऱ्याच्या बांधावरून ठिय्या आंदोलन
बार्शी: महाराष्ट्रामध्ये व बार्शी तालुक्यामध्ये शेतकरी बांधवांसमोर युरिया खताची कृत्रिम टंचाई व खतांचा काळाबाजार ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. या युरीया खताच्या कृत्रिम टंचाईस व काळ्या बाजारास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्रातील आघाडी सरकारच्या विरोधात बार्शी तालुका व शहर भाजपच्या वतीने माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार राजेंद्र राऊत, भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्सचे नियम पाळत, आज अलीपूर येथील शेतकरी धर्मराज सुरवसे यांच्या शेतातील बांधावर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या या आंदोलनात महायुतीतील मित्रपक्ष आर.पी.आय. (आ), रासप यांनीही सहभागी होऊन पाठिंबा दिला. या आंदोलन प्रसंगी आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करत आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांच्यावतीने मा. तहसीलदार बार्शी यांच्याद्वारे मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व कृषिमंत्री दादाजी भुसे साहेब यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन बार्शीचे तहसीलदार साहेब यांच्या वतीने मंडल अधिकारी उमेश डोईफोडे यांनी आंदोलन स्थळी स्वीकारले.


आंदोलनकर्त्यांनी निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. शेतकऱ्यांना बॅंकेकडून नाकारला जाणारा कर्जपुरवठा, नकली सोयाबीन बियाणांमुळे करावी लागणारी दुबार पेरणी, दुधाला मिळणारा कमी भाव अशा विविध संकटांमध्ये आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
आता या संकटाच्या माळेमध्ये युरिया खताचा कृत्रिम तुटवडा व काळाबाजार यांची भर पडली आहे. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. युरिया खताची कृत्रिम टंचाई व काळाबाजार करणाऱ्या कृषी खात्यावर कारवाई करून शेतकऱ्यांना युरिया खताचा पुरवठा नियमित व मुबलक प्रमाणात करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.

या मागणीची दखल न घेतल्यास पुढील काळात बार्शी शहर व तालुका भाजपच्या वतीने हजारों शेतकऱ्यां समवेत रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.