पोलिसांवर खुनी हल्ला करून तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपींना अटक; राज्यप्राणी शेकरुची करत होते तस्करी
पुणे – महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरुची तस्करी करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर खुनी हल्ला करून तीन वर्षापासून फरार असणाऱ्या आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. रघुनाथ दामू वाघे (वय ४५), संतोष रघुनाथ वाघ आणि सखाराम दामू वाघ अशी जेरबंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण खेड तालुक्यातील शिरगाव येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील आरोपी शेकरू या प्राण्यांची तस्करी करणार असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार खेड पोलिसांचे एक पथक यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्या गावात गेले होते.

यावेळी कारवाई करत असताना स्थानिकांनी पोलिसांवर खुनी हल्ला केला होता. या हल्ल्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे सात जण जखमी झाले होते. खेड पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सर्व आरोपी हे तेव्हापासून फरार होते.
दरम्यान, फरार असलेले हे आरोपी गुरुवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या गावात आले असल्याची माहिती खबऱ्या मार्फत ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी आज पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून त्यांना अटक केली.