नांदेड : या विश्वात प्रत्येक माणूस आपली विशेष ओळख घेऊन जन्माला येत असतो. त्यामध्ये संत- महात्मे, सुधारक, विचारवंत, कलाकार, साहित्यिक यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. यापैकीच साहित्यक्षेत्रातील अंबराच्या तारांगणात एक तेजोमय शुक्रतारा ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे’ या नावाने चकाकला.अशा या साहित्यसम्राट आणि लोकशाहीरास विनम्र अभिवादन. ता. एक ऑगस्ट 1920 रोजी वाटेगावात वालुबाई भाऊराव साठे या दांपत्यास तुकाराम नावाचं मूल जन्माला आलं.

तुकारामांची इतर भावंडे त्यांना मोठे असल्याने ‘अण्णा’ म्हणून बोलायचे. आणि म्हणून तुकारामाचा अण्णाभाऊ झाला. तो लहानपणी वारणा नदीच्या पात्रात आपल्या सवंगड्यांसोबत खूप खेळायचा, बागडायचा गाणे गायचं हे सारं ग्रामीण जीवन अण्णांनी अनुभवलेलं होत.
अण्णा शाळेत जाऊ लागले. पण त्यांचे मन शाळेत रमले नाही. दोन दिवसात अण्णाची शाळा संपली. घरची परिस्थिती फार खराब होती. खेडेगावात एवढ मोठ कुटुंब भाऊराव साठे जगवणे कठीण होते. त्यासाठी त्यांनी आपले बि-हाड मुंबईला हलवले. तेथे अण्णा भाऊंनाही कष्टांची कामे करावी लागली. कोळसे वेचणे, फेरीवाल्यांच्या पाठीमागे गाठोडे वाहने ही कमी त्यांना करावी लागली. पण त्यांची दृष्टी गतिमान होते. त्याच काळात त्यांनी डोक्यावरुन गाठोडे वाहतांना दुकानांच्या पाट्या वरची अक्षरे जुळवून ते नावे वाचण्याचा प्रयत्न करीत असत.

यातूनच त्यांना वाचनाची गोडी लागली आणि त्यांची नाळ शिक्षणाची जोडलेली गेली. पुढे त्यांना गिरणीत नोकरी मिळाली. आणि कामगारांची पिळवणूक त्यांचं दुःख त्यांनी अगदी जवळून बघितलं आणि अनुभवल सुद्धा. आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अण्णाभाऊंच्या सूप्त कलेचा त्यांना विशेष उपयोग झाला. तमाशा, कलापथक, पोवाडे यांच्यातून जागृती आणि प्रबोधनपर गीते लिहायला सुरुवात केली. आणि याच माध्यमातून दीनदुबळ्या उपेक्षितांचे दुःख जगाच्या वेशीवर टांगली.
त्यांचा लढा साहित्यातून सुद्धा भरारी घेत होता
पुढे त्यांचा कॉ. डांगे पासून ते शशिकांत तासगावकरपर्यंत तसेच कॉ. के. एम. साळवी, शंकर पगारे, विश्राम गांगुर्डे, तुकाराम सरपाते ,बी. टी.रणदिवे या कार्यकर्त्यांच्या ते सानिध्यात आले. आणि त्यांच्या चळवळीला जोर आला. या चळवळीने सारा महाराष्ट्र धु्वून काढला आणि जागृत केला. त्यातच अण्णाभाऊच्या लेखणीला धार आली होती.

आता त्यांचा लढा साहित्यातून सुद्धा भरारी घेत होता. आपल्या कथेतल्या नायकाकरवी समाजामध्ये जागृती घडून आणीत होते. वारणेचा वाघ, मास्तर, अकलूज, मूर्ती, मंगला, अशा 32 कादंबऱ्या, तर बरबाद्या, कंजारी, लाडी, आबी, निखारा, खुळवाडी, गजाआड, फरारी,चिरागनगरची भूत अशी तेरा कथासंग्रह त्यांचे प्रकाशित झाले होते. तसेच इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही तीन नाटकं आणि अकलीची गोष्ट, खापऱ्या चोर, देशभक्त, घोटाळे, बिलंदर बुडवे, माझी मुंबई आणि शेटजींची इलेक्शन अशी 11 लोकनाट्य त्यांनी लिहिली. यावर बऱ्याच त्याच्या कथेवर चित्रपट निघाले.
अण्णाभाऊंच्या ‘फकीरा’ या कादंबरीने विश्व रेकॉर्ड केले

अण्णाभाऊंच्या ‘फकीरा’ या कादंबरीने विश्व रेकॉर्ड केले. ही शासन पुरस्कार प्राप्त झाली आणि आपला पहिला पुरस्कार अण्णाभाऊंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ते अर्पण केला. अण्णांचा दृष्टिकोन मानवतावादी होता. परंपरेने वाहत असलेली सर्व सुखाची गंगा काही ठराविक मूठभर लोकांपर्यंत वाहत होती.
बाजूला दुःख दारिद्र्याच्या खाईत इथला मोठा बहुजन समाज गाडला जात होता. समाज व्यवस्थेने माणसामाणसात निर्माण केलेली दरी अण्णांनी अचूक हेरली होती. त्यांच्या मनावर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. आणि म्हणून त्यांनी आपल्या साहित्यातून या थोर विचारवंतांची विचार धारा बहुजन समाजात पेरली होती. म्हणून ते म्हणतात.
‘जग बदल घालुनी घाव
मज सांगून गेले भीमराव ‘
त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक न्यायाची, शोषण मुक्तीची क्रांतिकारी चळवळ जवळून बघितली होती. आणि म्हणूनच अण्णाभाऊ बाबासाहेबांच्या विचारकडे आकर्षित झाली होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजास मोलाचा संदेश दिला. तो म्हणजे शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा. हीच विचारसरणी घेवून अण्णांचा साहित्य रथ पुढे जात होता. कारण अज्ञान हेच दारिद्र्याचे मुख्य कारण हे त्यांनी जाणले होते. त्यासाठी तळागाळातील मानसांपर्यंत शिक्षण पोहोचणे गरजेचे होते.
संघटन आणि अन्यायाचा प्रतिकार करणे यासाठी लागणारे बळ म्हणजे शिक्षण होय. यातूनच लोकशाहीची मूल्य रुजली जातील तसेच भगवान बुद्धाचा संदेश प्रज्ञा, शील, करुणा यांचे महत्त्व जाणून त्यांनी आपल्या साहित्यातून ईमानदार, शिलवंत नायक उभा केला होता. तो वाचकांच्या मनात मानसातला माणूस उभा करीत होता. यात फकिरा, भीमा, सावळा सत्तू यांचा आवर्जून उल्लेख करता येईल.
आजही त्यांचा विचार मानवतेकडे घेवून जाणारा आहे. एकता, समता, स्वातंत्र्य, न्याय प्रस्थापित करणारा आहे. विज्ञानवाद जागवणारा आहे. त्यासाठी आपणास अण्णाभाऊंचा विचार समजून घेणे खूप गरजेचे आहे. भाऊचा विचार म्हणजे फुले- शाहू- आंबेडकरी महासागराला जावून मिळणारी नदी आहे.. जो या नदीचे पाणी प्राशन करेल, त्याच्या जीवनाचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही.
शब्दांकन- बाबुराव पाईकराव, सहशिक्षक, डोंगरकडा, ता. कळमनुरी, जिल्हा हिंगोली.