बार्शी शहर व तालुक्यात तीन दिवसात 174 कोरोना रुग्णाची वाढ
बार्शीकरांसाठी आठवडा धोकादायक; सहा दिवसात 300 रुग्णांची भर

बार्शी : बार्शी शहर व तालुक्यात कोरोना विषाणू रौद्ररूप धारण करू लागला असल्याचे वाढत असलेल्या आकडेवारी वरून दिसू लागले आहे. या आठवड्यातील पहिल्या तीन दिवसात 127 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते.तर गुरुवारी 60, शुक्रवारी 56 तर शनिवारी देखील 58 नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असल्याची माहिती प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ एस के गायकवाड यांनी दिली.शुक्रवार आणि शनिवारी रुग्णात बार्शी शहरातील 77 तर ग्रामीण भागातील 37 रुग्णाचा समावेश आहे.


वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. आरोग्य आणि महसूल विभाग कामाला लागला आहे. नगरपालिका आणि पोलीस विभागाने नियम मोडणाऱ्या विरोधात कारवाई सुरू केल्या आहेत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. शहरात व्यापाऱ्यांच्या टेस्ट दररोज केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.आज शहरात 566 आणि ग्रामीण भागात 608 अँटीजेन ग्रामीण भागात 1 आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली आहे.आज 6 जण उपचारानंतर बरे झाले. तर एक जण मयत झाला आहे.
बार्शी शहर मोठी व्यापारी पेठ असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून विना मास्क फिरणारे नागरिक, दुकानात गर्दी करणारे व्यापारी यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. तरी देखील कित्येक लोक विनामस्क फिरत आहेत. गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. लग्न समारंभात कोरोना नियमाचे पालन केले जात नाही.तसेच पालिकेच्या वतीने शहरातील व्यापाऱ्यांची अँटिजेन टेस्ट केली जात आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे.