अक्कलकोट | पाऊस वाढल्यामुळे कुरनूर धरणाचे सहा दरवाजे उघडले
अक्कलकोट : हवामान विभागाने पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा जाहीर केला आहे.यास अनुसरून सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू झालाय. अक्कलकोट तालुक्याची वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणात हरणा नदीवाटे मोठा विसर्ग सुरू झाल्यानंतर कुरनूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून, यातून बोरी नदीत १६५० क्यूसेक प्रतिसेकंद पाणी सोडण्याची कार्यवाही करण्यात आली.

८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या कुरनूर धरणात सध्या ८१ टक्के म्हणजेच ६६५ दशलक्ष घनफुट पाणीसाठा आहे. सद्यस्थितीत पावसाचा अंदाज पाहता धरण कधीही पूर्णक्षमतेने भरू शकते.मागील दोन तीन वर्षांपासून अक्कलकोट तालुक्यात बोरी नदीकाठी पूरपरिस्थिती उद्भवली होती.यामुळे नदीकाठच्या गावांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते.

कित्येक जनावरे वाहून गेली होती.भुतकाळची परिस्थिती लक्षात घेता गेल्या वर्षांपासून तालुका प्रशासनाकडून धरणाची जबाबदारी योग्यरीत्या सांभाळली जात आहे.मागील पूरपरिस्थिती पाहण्यासाठी खुद्द राज्याचे माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौरा केला होता.
सध्यस्थितीत वरून येणारा पाण्याचा प्रवाह बंद होईपर्यंत धरणाचा विसर्ग सुरूच ठेवण्याचा इशारा संबंधित विभागाने दिला. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ही देण्यात आला आहे.