भाजपा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल !
भाजपा माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल ! सोलापुर पोलीस करणार तपास
सोलापुर :- सोलापूरचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. बेडरूममधील एका व्हायरल व्हिडिओमुळे ते वादात सापडले होते.

एका महिलेने आत्याचार करून फसवणूक केल्याचे आरोप त्यांच्यावर केले होते. त्यानंतर आता देशमुख यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा काही दिवसांपू्र्वी एका महिलेसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये तिने देशमुख यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. यानंतर देशमुख यांनी आपल्या भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. हे प्रकरण विवाहबाह्य संबंधांच्या अवतीभवती असल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून आले.
या प्रकरणानंतर श्रीकांत देशमुख आणि पीडित महिला यांचं कथित संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. आता या प्रकरणी पुण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.
पीडित महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर लग्नाचं आमिष दाखवून आपल्यासोबत शारिरीक संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर तिने पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात पीडित महिला माध्यमांना संवाद साधणार आहे.
पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सोलापूरला वर्ग करण्यात आला आहे. कलम ७६, ७७, ५०४, ५०६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पुण्यातील डेक्कन पोलिसांनी दिली आहे. दरम्यान हे प्रकरण सोलापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं असून पुढील तपास सोलापूर पोलीस करणार असल्याची माहीती आहे.(सौजन्य सकाळ)