एका सेवानिवृत्त तहासिलदाराचे खुद्द मुख्यमंत्र्यांना विचार करायला लावणारे पत्र वाचा…..!

0
257

एका सेवानिवृत्त तहासिलदाराचे खुद्द मुख्यमंत्र्यांना विचार करायला लावणारे पत्र वाचा…..!

सुरज गायकवाड

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

ग्लोबल न्यूज: सध्या देशात नाही तर संपूर्ण महराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संख्येत हजाराच्या संख्येने वाढ होत आहे. तसेच मृत्युचे प्रमाणही काही अंशतः वाढलेले दिसून येत आहे त्यामुळे राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणा या कोविड – 19 या आजाराशी झुंज देण्यासाठी सज्ज झाले आहेत मात्र राज्यात तसेच मुंबई सारख्या भागात इतर आजाराने ग्रासलेल्या रुग्णांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. हीच परिस्थिती पाहून एक तहसीलदराने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

काय आहे पत्रात, वाचा जसंच्या तसं.

प्रति,
माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य, मुंबई

विषय : विटंबना ! मरण यातना !

महोदय,
मरण यातना स्वस्त करण्यासाठी, आपणास नम्रपणे हे पत्र लिहीत आहे. माझे नाव श्री. श्रीकृष्ण गणपत गोसावी वय ६५ वर्ष, रा. गणपत बुवा चाळ, मालपा डोंगरी नं. ३, महाकाली रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३. येथील झोपडपट्टीत राहून, सार्वजनिक शौचालायचा वापर करणारा सेवानिवृत्त ‘तहसीलदार’.

आपणास हे लिहिताना डोके गरगरते ! हृदय फाटते ! मन विदीर्ण होते ! अंगावर शहरे येतात ! डोळे पाणावतात ! कोरोना आजाराचे राज्यावर मोठे संकट आहे. हे मान्य आहे. पण संपूर्ण मुंबईत इतर आजारी माणसांचा कोणता गुन्हा आहे, की त्यांनी उपचाराविना, तडफडून तडफडून मरावे. याचे उत्तर अपेक्षित आहे. वर नमूद केलेल्या ठिकाणी राहणारी १) श्रीमती द्रुपदी अर्जुन रहाटे – मूत्रसंसर्ग, २) श्री. लवू विश्वनाथ भालेकर – हृदयरोग, मधुमेह, ३) श्री. शिवाजी सदाशिव सावंत – कॅन्सर, हि माणसे त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचार मिळाला नाही म्हणून तडफडून मेली.

या पैकी श्री. शिवाजी सदाशिव सावंत हे जवळपासच्या.

१) ट्रॉमा हॉस्पिटल – जोगेश्वरी
२) कूपर हॉस्पिटल – विलेपार्ले
३) नानावटी हॉस्पिटल – विलेपार्ले
४) संजीवनी हॉस्पिटल – अंधेरी पूर्व
५) जीवन विकास हॉस्पिटल – अंधेरी पूर्व
६) होली स्पिरिट हॉस्पिटल – अंधेरी पूर्व
७) उमा नर्सिंग होम – अंधेरी पूर्व

अशा सात हॉस्पिटल मध्ये सकाळी ६ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत भटकले. प्रत्येक ठिकाणी त्यांना कुत्र्यासारखी वागणूक मिळाली. प्रत्येक ठिकाणी लाचार होऊन, पाया पडून, जिवाची भीक मागून कुणालाही दया आली नाही. त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांनी दिनांक १४/०५/२०२० रोजी हताशपणे तडफडून प्राण सोडला. हे जर असेच सुरु राहिले तर कोरोना आजारापेक्षा अधिक संख्येनी, अशी माणसे मरतील आणि त्यांची संख्या कधीच कुणाला कळणार नाही. आज एक कोरोना रुग्ण आढळला की ब्रेकिंग न्यूज होते. मग इतर आजाराने, उपचारांविना मरणाऱ्यांचे काय?

आजची परिस्थिती पाहता, कोरोना आजाराव्यतिरिक्त इतर आजारावर कोणतेच आणि कोणीही उपचार करणार नसतील, तर मग या लाचार, गरीब जनतेने कुणाकडे जायचे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये बरेच डॉक्टर आणि कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात. तर काही डॉक्टर आणि कर्मचारी प्रेत जळणाऱ्या आगीवर आपली पोळी भाजून घेतात. याची चौकशी होणे आवश्यक आहे.

दया, माया, माणुसकी नाही. खाजगी रुग्णालयवर कुणाचे, कसलेही बंधन दिसून येत नाही. खाजगी डॉक्टरांपैकी, काही डॉक्टर आजाराची भीती सोडून निर्धास्तपणे रुग्णाची सेवा करीत आहेत. पण काही डॉक्टरांनी रुग्णांकडून लाखो रुपये कमावले. मात्र यावेळी त्यांनी आपले दवाखाने बंद ठेवले होते. म्हणजे मी सैन्यात किंवा पोलिसात, भरती होईन, पण प्रत्यक्ष लढाईच्या किंवा दंगलीच्या वेळी काम करणार नाही. असे म्हणणे हे समजण्यापलीकडचे आहे.

वर नमूद केलेल्या तीन मयतांच्या कुटुंबाकडून, शासकीय यंत्रणा, टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्र प्रतिनिधी यांचे मार्फत, खरी माहिती घेऊन संबंधित हॉस्पिटलची सविस्तर चौकशी करून याबाबत शासन स्तरावर योग्य कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. जेणे करून पुढे अश्या घटना घडून प्राणहानी होणार नाही.
कागदावरचे आदेश, नियम आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी, यामधील तफावत कोणती, याची पाहणी केल्यास खरे सत्य बाहेर येईल.

मरणाराने मरत राहावे ! मारणाराने मारत राहावे !

मारता मारता मरणाऱ्याच्या, टाळू वरील लोणी खावे !

साहेब त्वरा करा, चिंतन करा, विचार करा, मदत करा ! अशी आपल्या चरणी या वृद्ध इसमची विनम्र प्रार्थना. कळावे.

ह्या पत्राचा मुख्यमंत्र्यांनी विचार करत इतर रुग्णांच्या तब्येतीकडे लक्ष दिले जावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Best IT Comany In Maharashtra , Solapur