15 एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथील होईल की नाही? आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट 

0
278

मुंबईः  देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊ लागल्यानंतर केंद्र सरकारनं देशभरात लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 24 मार्चला देशात 21 दिवस संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली. आता लॉकडाऊन संपण्याची वाट सर्वच जण बघत आहेत. 21 दिवसांचा लॉकडाऊन संपायला आता केवळ सात दिवस शिल्लक आहेत.  त्यामुळे गेल्या 14 दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत.

 मात्र, देशातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाऊन आणखी लांबणार असल्याची शक्यता आहे. राज्यातील मात्र 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन संपेल अशी शक्यता कमी आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे.  कारण 15 एप्रिलनंतर लॉकडाऊन 100 टक्के शिथील होईल असं कुणीही गृहीत धरु नये, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी संध्याकाळी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, लॉकडाऊनबाबतची निर्णय प्रक्रिया 10 एप्रिलनंतर सुरु होईल. मुंबईतील आणि महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील मृत्यूदर अपेक्षेपेक्षा जास्त असून तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. अशा परिस्थितीत योग्य खबरदारी घेणे महत्त्वाचं आहे. त्यामुळे लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवला जाऊ शकतो. लॉकडाऊन उठवण्याची प्रक्रिया केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात येईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले की, जगातच कोरोनाची साथ आलेली आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर लॉकडाऊन शिथिल कसा करायचा यासंदर्भात काही गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकार अभ्यास करून राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना पाठवत असते. त्यानुषंगाने राज्य सरकार काम करते. त्यामुळे 10 आणि 15 एप्रिलच्या दरम्यान जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा बारकाईनं अभ्यास करून त्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्र सरकारचे सल्लागार यांच्या अनुषंगानं ठरवावं लागेल. परंतु एक निश्चित आहे की, संपूर्ण लॉकडाऊन उठेल, असं कुणीही डोक्यात ठेवू नये.

100% टक्के यामध्ये काळजीपूर्वक काम करावं लागणार आहे. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी खूपच जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे लॉकडाऊन 15 एप्रिलनंतर 100 टक्के शिथिलच होईल, असं कुणीही गृहित धरू नये, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्य शासनाकडे 37 हजार PPE (पर्सनल प्रोटोक्टिव्ह इक्विपमेंट), साधारण दोन-सव्वा दोन लाख मास्क कोविड रुग्णालयाकडे आहेत. 1500 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. केंद्र सरकारने परिपत्रक काढलं आहे, त्यानुसार PPE, N-95 मास्क, व्हेंटिलेटरर्स राज्य सरकार खरेदी करू शकणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे 2125 व्हेंटिलेटर, 8 लाख 41 हजार N95 मास्क, 3 लाख 14 हजार PPEs ची मागणी केली आहे. केंद्राने देश स्तरावरून हे उपलब्ध करून दिले पाहिजे, असं राजेश टोपे यांनी म्हटलं.

Best IT Comany In Maharashtra , Solapur