४० प्रकारचे वाद्यं वाजविणारा ‘अवलिया’
अमोल सिताफळे
सोलापूर -एकावेळी अनेक वाद्याची झलक दाखवणं तसं कठीणच. पण नागेश भोसेकर या कलाकारानं ही किमया करून दाखवली आहे. ४० प्रकारचे वाद्य वाजवण्याचे कौशल्य त्यांनी विकसित केले आहे. घरात संगीत कलेचा कोणताही वारसा नसतानाही एकलव्य बनून ही कला आत्मसात केली. मूळचे सोलापूरचे असलेले नागेश सध्या पुण्यात एक व्यावसायिक वादक म्हणून काम करत आहेत.

गणेशोत्सव, नवरात्र उत्सवादरम्यान आपण पारंपरिक वाद्यांना अधिक पसंती देतो. मात्र, या मंगल दिवशीच आपल्याला या वाद्यांची आठवण होते. डीजेच्या तालावर थिरकणारी तरूणाईला वाद्य संस्कृतीचा विसर पडला आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव वाढत चालल्यामुळे आपली लोककला आणि वाद्यं एक दिवस इतिहास जमा होतील, अशी चिंता नागेश यांना सतावत होती मग ही लोककला जपण्यासाठी नागेश यांनी पुढाकार घेतला.
लहानपणी नागेश आपल्या मित्रासोबत तबला शिकण्यासाठी
कै. रामाचार्य बागेवाडीकर यांच्याकडे जायचे. तब्बल बारा वर्षे म्हणजे एक तप तबला वादनाचा गुरूमंत्र आपल्या गुरुकडून घेतला. पुढे आठ वर्षे पांडुरंग घोटकर यांच्याकडून पारंपारिक ढोलकी वादनाचे धडे घेतले, जगप्रसिद्ध तालवाद्य वादक उस्ताद तौफिक कुरेशी यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. सोलापुरातील प्रसिद्ध लावण्यखणी या कार्यक्रमातील ८५० प्रयोगात वादन केले हा त्यांचा पहिला व्यावसायिक कार्यक्रम.

तबला आणि ढोलकी वाजवण्याची कला आत्मसात केल्यानंतर
नागेश यांनी इतर पारंपरिक वाद्य वाजण्याकडे त्यांचा कल निर्माण झाला. नगारा, दिमडी, हलगी, ढोलक, ढोल, ताशा, डमरू, संबळ, टाळ, मंजिरी, खंजिरी, झांज, चिपळ्या, बगलबच्च, लेझीम, पखवाज, डफ, तुणतुणा, ही वाद्य कोणत्याही प्रशिक्षणा विना वाजवायला शिकले. आज रेकॉर्डिंग क्षेत्रात आणि कार्यक्रमात त्यांची या वाद्य वाजवण्यावर हुकूमत आहे.

चौकट
चित्रपटात केले वादन
आजवर २००० पेक्षा जास्त कार्यक्रमातून वादन केले अाहे.
अलबम साठी ५०० गाण्यासाठी रेकॉर्डिंग ला साथ दिली.
काळूबाईच्या नावानं चांगभलं, अप्पा आणि बाप्पा, आनंदी गोपाळ आगामी हंबीरराव या चित्रपटात त्यांनी वादन केले आहे.
कलाकार घडवायचे आहे
विश्वविनायक वाद्यवृंदाची ५ वर्षांपूर्वी स्थापना करून युवा पिढीला पारंपारिक ढोल ताशा वादनाचे धडे देऊन समाजात चांगला उत्सव साजरा व्हावा यासाठी कार्य करत आहेत. आजवर देश विदेशात अनेक मोठ्या कलावंतासोबत कला सादर केली आहेच पण आगामी काळात संगीत संयोजक म्हणून रेकॉर्डिंग क्षेत्रात मोठं काम करण्याच स्वप्न आहे. मी लहानपणापासून वाद्य वादनाचे आणि संगीताची कला जोपासली आहे. रिमिक्स, डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईला खऱ्या संगीताची ओळलख करून देत भविष्यात निसर्ग संगीताला साथ देणारे कलाकार मला घडवायचे आहेत.
नागेश भोसेकर
ताळवाद्य वादक