हेल्थ इंजिनियर घेत आहेत बार्शीकरांची काळजी
बार्शी : कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलेले असल्याने सर्वच देश याविरोधात लढा देत आहेत. सर्वत्र आरोग्य व पोलीस यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. या महामारीच्या कठीण प्रसंगात बार्शी शहरात ३०० हेल्थ इंजिनिअर (सफाई कर्मचारी) बार्शीकरांच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेताना दिसत आहेत.
सुमारे ३६ चौरस किमी बार्शी शहराची हद्द आहे तर साधारण लोकवस्ती असलेला परिसर १२ चौरस किमी इतका मोठा आहे. चाळीस वॉर्ड, वीस प्रभाग तसेच सुमारे ३० हजार मिळकती असलेले हे शहर आहे. शहरात सुमारे दीड लाख लोकसंख्या राहते. कोरोनाची साथ देशात सुरू होताच सर्वत्र अलर्ट करण्यात आले होते. सुदैवाने सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळुन आलेला नाही. त्यामुळे सध्यातरी आरोग्य यंत्रणेवर तेवढा ताण नाही. मात्र कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पोलीस व नगरपालिका यंत्रणा युद्ध पातळीवर लढताना दिसत आहे.

बार्शी नगरपालिकेत आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष अँड.असिफ तांबोळी,मुख्याधिकारी शिवाजी गवळी यांच्या नेतृत्वाखाली नियोजन आखण्यात आले आहे. त्या नुसार पालिकेचे २० अधिकारी व ३०० कर्मचारी शहरात सर्वत्र स्वच्छता, फवारणी, जनजागृतीचे काम करत आहेत. बार्शीत ३० एचटीपी पंप, १५ हॅण्ड पंप तसेच अग्निशामक दलाच्या बंबा द्वारे हायपो क्लोरीन सोल्युशन १% याची फवारणी करण्यात येत आहे.
मागील २० दिवसात शहरात प्रत्येक घरापर्यंत तीन वेळा फवारणी झाली असून चौथ्या वेळेस फवारणी करण्याचे काम सुरू आहे. शहरात सकाळच्या सत्रात विविध ठिकाणी भाजीपाला विक्रेते बसतात त्या ठिकाणीही तात्काळ स्वच्छता करण्यात येते. देशा वरील कोरोनाच्या संकटात हेल्थ इंजिनिअर (सफाई कामगार) यांचे योगदान मोलाचे आहे. बार्शी शहराचा विचार करता त्याच्या अहोरात्र मेहनती मुळेच सध्या सर्वत्र स्वच्छता व हेल्थी वातावरण आहे.